जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नालासोपारा येथील जेट एअरवेजच्या एका कर्मचाऱ्याने चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. शैलेशकुमार सिंह असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. शैलेशकुमार यांच्या मागे पत्नी, २ मुली व २ मुले असा परिवार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचाऱ्यांना वेतन न दिल्याने ही परिस्थिती त्याच्यावर ओढावली आहे, असा दावा जेट एअरवेजच्या स्टाफ अँड एम्प्लॉईज असोसिएशनने केला आहे.

बँकांकडून ४०० कोटींची मदत न मिळाल्याने जेट एअरवेजची सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. १७ एप्रिलपासून जेट एअरवेजची विमानसेवा बंद झाली असून त्यामुळे २० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली आहे. या कर्मचाऱ्यांना अनेक महिने पगार मिळालेला नाही. त्यामुळे सर्वच कर्मचारी हवालदिल झाले आहेत. त्यातूनच शैलेशकुमार गेल्या अनेक दिवसांपासून आर्थिक संकटात होते. त्यामुळे त्यांनी नाला सोपारा पूर्व येथील ओसवाल नागरी येथील साईपूजा अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली.

मात्र, पोलिसांकडून वेगळीच माहिती सांगितली जात आहे. शैलेशकुमार सिंह यांना लिव्हर कॅन्सर होता. कन्सर सारख्या गंभीर आजाराच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी तक्रारीत म्हटले आहे.