खाप पंचायतीनं जोडप्याला सुनावलं ‘शेण’ खाण्याचं फर्मान, FIR दाखल

झांसी : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील खाप पंचायतीचे तालिबानी फर्मान थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आला आहे. बुंदेलखंडमध्ये खाप पंचायतीने एक तुघलकी फर्मान जारी केले आहे, ज्यानंतर पोलीस आणि प्रशासनसुद्धा हादरून गेले आहे. शूरवीरांची धरती म्हणून प्रसिद्ध असलेल्या झांसीमध्ये खाप पंचायतीच्या तालिबानी फर्मानामुळे दाम्पत्याच्या अडचणी वाढल्या आहेत. आरोप आहे की खाप पंचायतीने दाम्पत्याला गोमूत्र पिणे आणि शेण खाण्याचा आदेश दिला आहे. हे प्रकरण प्रेमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. जेथे पाच वर्षांपूर्वी प्रेमीयुगुलाने कुटुंबियांच्या सहमतीने विवाह केला होता. दोन्ही कुटुंबांचे सदस्य विवाह सोहळ्याला उपस्थित होते.

विवाहाच्या पाच वर्षानंतर गावामध्ये बसलेल्या खाप पंचायतीने प्रेमी युगुलांना जातीच्या बाहेर काढले. पीडित दाम्पत्याने खाप पंचायतीवर आरोप करताना म्हटले की, खाप पंचायतीने तुघलकी फर्मान सुनावताना गोमूत्र प्यायल्यानंतर आणि शेण खाल्ल्यानंतरच जातीमध्ये पुन्हा घेतले जाईल असे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर पंचायतीने पाच लाख रुपयांचा दंड लावण्याचे फर्मान सोडल्याने अडचणी आणखी वाढल्या आहेत. खाप पंचायतीच्या फर्मानाने त्रस्त दाम्पत्याने जिल्हाधिकारी आणि एसएसपी यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे.

खाप पंचायतीच्या तुघलकी फर्मानाला गंभीर्याने घेत जिल्हाधिकारी शिव सहाय अवस्थी आणि एसएसपी डी प्रदीप कुमार यांनी पीडित दाम्पत्याच्या घरी सीओ आणि सिटी मजिस्ट्रेट यांना पाठवून संपूर्ण प्रकरणाची माहिती मागवली. डीएम शिव सहाय अवस्थी यांचे म्हणणे आहे की, चौकशी सुरू आहे. खाप पंचायतीचे फर्मान सुनावणार्‍या पंचांच्या विरूद्ध केस दाखल करण्यात आली आहे. जिल्हाधिकार्‍यांनी या दाम्पत्याला सुरक्षा दिली आहे.