पोलीस ठेवत आहेत आमदारांच्या हालचालींवर ‘पाळत’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील राजकीय भूंकपामुळे सर्वच स्तरावर खळबळ उडाली असून प्रत्येक जण दुसरा काय करतोय, याकडे लक्ष ठेवून आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांच्या हालचालीवर पोलिसांकडून गुप्तपणे पाळत ठेवली जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार वास्तव्यास असलेल्या हॉटेल रेन्साँ येथे एक पोलीस अधिकारी नजर ठेवून असल्याचे आढळून आले.

आमदार जितेंद्र आव्हाड हे रविवारी आमदारांना भेटायला हॉटेल रेन्साँ येथे आले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांन ही बाब आव्हाड, खासदार श्रीकांत शिंदे यांना सांगितली. त्यांनी विचारणा केली असता सुरुवातीला पोलिसांनी ओळख लपविण्याचा प्रयत्न केला, त्यांना जाब विचारल्यानंतर त्यांनी ओळखपत्रे दाखविली. ती पाहिल्यानंतर, ‘एवढा सिनीअर अधिकारी येऊन बसतो कसा? आम्हाला काय येडे समजतात का? काय तुमचे कामच काय इथे ?’, असे प्रश्न आव्हाड यांनी अधिकाऱ्याला विचारले. त्यानंतर संबंधित अधिकारी व अन्य साध्या वेषातील पोलीस तेथून निघून गेले.

फडणवीस सरकार आमदारांना फोडण्यासाठी पोलिसांची मदत घेत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आमदारांना ठेवण्यात आलेल्या हॉटेलमध्ये प्रवासी असल्याचे सांगून काही जण उतरले असून ते आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अगदी पोलिसांपर्यंत आमदारांना ठेवलेल्या हॉटेलमध्ये उतरलेल्या सर्व ग्राहकांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. ते कोण आहेत, कशासाठी मुंबईत आले. याच हॉटेलमध्ये का उतरले, त्यांची ओळख पटविण्यात येत आहे. त्यांचे भाजपाशी काही संबंध आहेत का याची चाचपणी शिवसैनिक आपल्या पद्धतीने करत आहेत.

Visit : Policenama.com