मिळकतकराचे उत्पन्न वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ वापरणार, चोरी करणारे ‘रडार’वर : स्थायी समिती अध्यक्ष

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   महापालिकेचे मिळकतकराचे उत्पन्न वाढविण्यासाठी तब्बल ४०० अतिरिक्त कर्मचारी नेमण्यात येणार आहेत. प्रामुख्याने कर आकारणी न झालेली कायदेशीर,बेकायदा बांधकामे, वापरात बदल केलेल्या मिळकती शोधून त्यांची आकारणी करणे आणि थकबाकी वसुल करण्यासाठी हे मनुष्यबळ वापरण्यात येणार आहे. यासाठी अन्य विभागात काम करणारे २०० कर्मचारी आणि एकवट वेतनावर ४०० कर्मचारी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव आज स्थायी समितीमध्ये मंजुर केल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

हेमंत रासने म्हणाले, की मिळकतकर हा महापालिकेचा प्रमुख उत्पन्नाचा स्त्रोत आहे. आजमितीला शहरात अनेक मिळकती कर आकारणीखाली आलेल्या नाहीत. प्रशासनाच्यावतीने अधिकाअधिक मिळकती आकारणीखाली याव्यात यासाठी सातत्याने विविध उपाययोजना करण्यात येतात. परंतू अनेकदा मनुष्यबळाअभावी या योजनांना मर्यादीत यश मिळते, ही वस्तुस्थिती निदर्शनास आली आहे. या पार्श्‍वभूमीवर शहराचा भौगोलिक विस्तार पाहाता पुढील सहा महिन्यांसाठी तब्बल ४०० अधिकारी व कर्मर्‍यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे ठेवला होता. त्यानुसार महापालिकेच्या विविध विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना प्राधान्य देण्यात येईल. त्यातून २०० अधिकारी व कर्मचारी निवडण्यात येतील. तसेच सहा महिन्यांकरिता एकवट मानधनावर ४०० अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात येईल. अन्य विभागांची गैरसोय होउ नये, यासाठी एकवट मानधनावर नियुक्त करण्यात येणार्‍या कर्मचार्‍यांचाही वापर करण्यात येईल.

एकवट मानधनावर नियुक्त करण्यात येणार्‍या कर्मचार्‍यांमध्ये महापालिकेतून निवृत्त झालेले अधिकारी व कर्मचार्‍यांना ज्यांना मिळकतकर विभागाच्या कामकाजाची माहिती आहे, त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. किमान वेतन कायद्यानुसार एकवट मानधनावर नेमण्यात येणार्‍या कर्मचार्‍यांना दरमहा १९ हजार २५० रुपये मानधन देणे आवश्यक आहे. सहा महिन्यांसाठी यासाठी साधारण तीन कोटी रुपये खर्च येणार आहे. या मनुष्यबळाचा वापर करून मिळकतकर आकारणी विभागाचे कायमस्वरूपी २०० कोटी रुपये उत्पन्न वाढेल, असा दावाही हेमंत रासने यांनी केला आहे.