लासलगाव : ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी 2 दिवस संपावर

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना आजाराच्या काळात ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगले काम केलेले असतानाही लासलगाव ग्रामपंचायती च्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत लासलगाव शहर विकास समितीच्या वतीने ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी यांना कामावरून कमी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रशासनावर दबाव आणला जात असून त्या स्वरूपाच्या धमक्या दिल्या जात असल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा ग्रामपंचायत ग्रामपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्यावतीने दोन दिवसीय लाक्षणिक संप पुकारला आहे.

नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांना नाशिक जिल्हा ग्रामपंचायत ग्रामपालिका कामगार कर्मचारी संघटनेने निवेदन सादर केले असून लासलगाव शहर विकास समिती येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आली असून लासलगाव ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांची हेतुपुरस्कर बदनामी या समितीने सुरू केली असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. सध्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणूक झालेली असून कोरोणाच्या काळात या सर्व सफाई कामगारांनी आपल्या जिवाची पर्वा न करता नागरीकांच्या आरोग्याची काळजी म्हणून शहराची साफसफाई योग्यरीत्या ठेवलेली होती.

लासलगाव ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी अत्यंत तुटपुंज्या मानधनावर सेवा पुरवीत असताना कोरला काळात केलेले काम या समितीला दिसले कसे नाही असा प्रश्न उपस्थित केला जात असून आता या सफाई कर्मचाऱ्यांना कामावर कामावरून कमी करून टाकण्यासाठी प्रयत्न या समितीकडून केले जात असल्याचा आरोप करण्यात आला असून या शहर विकास समिती च्या धमक्या मुळे गुरुवार व शुक्रवार रोजी ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी लाक्षणिक संप पुकारला असल्याचे स्पष्ट केले आहे.

राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ उप विभागीय अधिकारी निफाड लासलगाव पोलीस कार्यालय यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनावर ग्रामपंचायत सफाई कर्मचारी प्रकाश खलसे, ज्ञानेश्वर देवरे, संतोष कोरे, बाळू पवार, विष्णू घोरपडे, विनोद पगारे, किसन पाथरे, संजय खलसे, रवींद्र घोरपडे, रईस बेग, समीर बेग, शाम खलसे, भास्कर खलसे ,अहमद बेग, रवींद्र पाथरे, आकाश गरुड, कमळाबाई बगाडे, शांताबाई पाथरे, द्रोपदाबाई खलसे, सुशीला पगारे यांच्यासह कर्मचारी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.