लासलगांव : विविध गाणी आणि संगीतावर थिरकले सरस्वती निर्मला विद्यालयाचे विद्यार्थी

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – येथील निर्मला सरस्वती कला, क्रीडा व सांस्कृतिक उत्सव-२०२० अंतर्गत भव्यदिव्य स्वरूपात वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण सुप्रसिद्ध भजन सम्राट पद्मश्री अनुप जलोटा, सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, सुप्रसिद्ध बाल गायिका सुरीली सानिका व श्यामली यादव, बाळासाहेब क्षीरसागर (अध्यक्ष, जि. प. नाशिक), संजय होळकर (चेअरमन, ग्रेनाच इंडस्ट्रीज लि.) अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष अशोक होळकर उपस्थित होते.

व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष सुलेमान मुलानी, सचिव जगदीश होळकर, संचालक गुणवंत होळकर, बाळासाहेब बोरसे, डॉ. विकास चांदर, सुहास झांबरे, संजय डागा, मुख्या. भीमराव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. मुख्या. शिंदे यांनी अहवाल वाचन केले.

सिनेअभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी लासलगाव चे कांदे व द्राक्षांचे आशियामध्ये नावलौकिक आहे, मुलांनी कला क्षेत्रात प्रगती करावी असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले. भजन सम्राट अनुप जलोटा यांनी मुलांचे कौतुक केले. तसेच जग मे सुंदर है दो नाम, ऐसी लागी लगन । मीरा हो गई मगन अशा वैविध्यपूर्ण भजनांनी श्रोत्यांची मने जिंकली.

१ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदना, शिवाजी महाराज, ढोल मोराच्या मानाचा, ओढणी डान्स, कथ्थक डान्स, कॉमेडी डान्स (फुगे घ्या फुगे), बुजगावणं डान्स, जय जय शिवशंकर, रामा रामा (तमिळ डान्स), गोंधळ (गायन-वादन), पंजाबी भांगडा, मेरा वाला डान्स, मेरी माँ, कटपुतली अशा वैविध्यपूर्ण गाण्यावर धडाकेबाज डान्स करून कलागुणांचे प्रदर्शन केले.

कार्यक्रमाला बहुसंख्येने पालक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रतिनिधी रूपाली शिंदे व प्रदीप ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.