थाळ्या वाजवायच्या नाहीत तर घरात बसून अंडी उबवायची का ?, भाजपची CM ठाकरेंवर खरमरीत टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना (shivsena) पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांचं भाषण म्हणजे OTT चा महा फ्लॉप शो होता. सर्व भाषण म्हणजे जळफळाट होता असा पलटवार भाजपचे (bjp) नेते आशीष शेलार (ashish shelar) यांनी केला आहे. थाळ्या वाजवायच्या नाहीत तर घरात बसून अंडी उबवायची का ? अशी जहरी टीकाही त्यांनी केली. विजयादशमीच्या दिवशी कुणाला वाईट बोलू नये म्हणून काल प्रतिक्रिया दिली नाही, असेही शेलार यांनी म्हटले आहे.

आशिष शेलार म्हणाले, कंगनाने वाट लावली त्याचं प्रतिबिंब भाषणात दिसते आहे. भाजपाच्या ताकदीचं दडपण उद्धव ठाकरे यांच्यावर दिसत होतं. सरसंघचालकांच्या भाषणाचा ठाकरेंवर विपर्यास केला आहे. संघाचा हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचं हिंदुत्व याची तुलना करु नका. संघाचं हिंदुत्व ही त्वचा आहे, तर शिवसेनेचं हिंदुत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी पांघरलेली शाल आहे. ती शाल कधीही बाजूला करता येते.

हिम्मत असेल तर सरकार पडून दाखव का म्हणतात. जे कर्माने पडणार आहेत त्यांना धर्माने पडायची गरज नाही. आमचं म्हणणं आहे पहिले घराबाहेर पडून दाखवा. टाळ्या आणि थाळ्या वाजवायचा नाहीत तर मग घरात अंडी उबवायची का ? अशी जहरी टीका शेलार यांनी केली. 1992 मध्ये आम्ही अयोध्येत गेलो होतो तेव्हा तुम्ही कुठल्या बिळात लपला होता असा थेट सवालही त्यांनी उद्धव ठाकरे यांना केला.

उद्धव ठाकरे हे तेच ते शब्द सातत्याने वापरतात. फक्त लिहून दिलेलं भाषण वाचून दाखवतात. किमान त्यांनी शब्द तरी नवीन वापरावेत असा टोलाही त्यांनी लगावला. या मेळाव्यात सर्वच काही वाईट नव्हतं तर फक्त एकच भाषण प्रभावी झालं आणि ते म्हणजे संजय राऊत यांचं असं सूचक विधानही त्यांनी केलं. यावेळच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्या आधी फक्त संजय राऊत यांचं भाषण झाल्याचे त्यांचं पक्षातलं वजन वाढलं असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शेला यांनी हे विधान केलंय.