मी पाकिस्तानला घाबरलो नाही तर.. ; गौतम गंभीरचा आपवर ‘षटकार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रोखठोक स्वभाव आणि स्पष्ट बोलण्यासाठी ओळखला जाणारा भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीर यंदा लोकसभेच्या आखाड्यात आपले नशीब आजमावत आहे. भाजपकडून तो दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढवत आहे. दिल्लीच्या रामलीला मैदानातील प्रचार सभेची ओपनींग करण्याची संधी गौतम गंभीरला मिळाली. यावेळी त्याने जोरदार बॅटींग करत आम आदमी पक्षावर निशाणा साधला.

यावेळी पुढे बोलताना गौतम गंभीर म्हणाला कि, मला लोक विचारतात की तू क्रिकेटमधून राजकारणात आल्यावर काय शिकलास ? यावर मी त्यांना एकच उत्तर देतो की, लढाई लढायची असेल तर समोरासमोरची असावी. पाठीमागून वार नको. यावेळी गौतम गंभीरने आम आदमी पार्टीवर देखील गंभीरने हल्ला केला. गेल्या १५ दिवसांत आम आदमी पक्षाने माझ्यावर खूप आरोप केले. कधी माझा उमेदवारी अर्ज रद्द करण्याचा प्रयत्न केला तर कधी माझ्यावर एफआयआर देखील केली. तर कधी म्हणतात मी वादविवादाला घाबरतो. मात्र मी त्यांना सांगू इच्छितो कि मी पाकिस्तानला नाही घाबरलो तर वादविवादाला काय घाबरणार..?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविषयी गंभीरला विचारले गेले असता तो म्हणाला कि, हे भाजपचे षढयंत्र असल्याचे केजरीवालांनी म्हटले होते. मात्र केजरीवाल अजून इतकेही मोठे नेते नाहीत कि भाजप त्यांच्यावर हल्ला करेन. आपले अपयश लपवण्यासाठी केजरीवाल भाजपवर आरोप करत असल्याचे देखील यावेळी गंभीर म्हणाला.