एक रुपया कमी द्या, पण ‘बॅट’ला मतदान करा ; शेतकऱ्याचे भावनिक आवाहन

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – अगामी लोकसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. प्रचार सभांना वेग आला आहे. कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हातकणंगले लोकसभा मतदार संघातून खासदार राजु शेट्टी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांचे निवडणूक चिन्ह बॅट आहे. खासदार राजू शेट्टी हे शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जातात. आता कोल्हापुरात एका आठवडी बाजारात खासदार शेट्टींप्रती असलेले प्रेम पहायला मिळाले. ‘एक रुपया कमी द्या पण बॅटलाच मतदान करा’ असा भावनिक प्रचार एका शेतकऱ्याने सुरु केला आहे. त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल होतो आहे.

आपला लाडका नेता निवडून यावा म्हणून अनेक कार्यकर्ते काहीही करायला तयार असतात अगदी उपवास करण्यापासून ते लग्नपत्रिकेत साहेबांना मतदान करा असे सांगणारे कार्यकर्ते आणि त्यांचे किस्से काही नवी गोष्ट नाही मात्र राज्यातील दुष्काळ परिस्थिती पहाता एका शेतकऱ्याने ‘भाजीला एक रुपया कमी भाव द्या पण बॅट ला मतदान करा’ असे आवाहन करणे चर्चेचा विषय बनला आहे.

शेतकऱ्यांसाठी लढणारे नेते म्हणून राजू शेट्टी यांचे नाव आहे. दुधाला दर मिळवून देण्यासाठी त्यांनी राज्यभरात तीव्र आंदोलन केले होते. यंदाच्या निवडणुकीत शेतकरी वर्गाचा पाठिंबा शेट्टींना मिळणार असे बोलले जात आहे.