गडकरींना पराभूत करण्यासाठी काँग्रेस वापरणार ‘डीएमके’ फॉर्म्युला

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नागपूरमध्ये केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेस ‘डिएमके’ फॉम्युला वापरणार आहे. नितीन गडकरींना पराभूत करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. काँग्रेसच्या डीएमके फॉर्म्युल्याचा तमिळनाडूतील डीएमके पक्षाशी काहीही संबंध नाही. काँग्रेसच्या या फॉर्म्युल्याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागल्याचं दिसत आहे. डीएमके हा खरं तर दलिम-मुस्लिम-कुणबी असा फॉर्म्युला आहे.

नागपूरमध्ये असलेल्या एकूण २१ लाख मतदारांपैकी १२ लाख मतदार दलित-मुस्लिम आणि कुणबी आहेत. त्यामुळे त्यांची मत ही निर्णायक मानली जात आहेत. काँग्रेसचे नेते नाना पटोले हे कुणबी असल्याने कुणबी मत तर त्यांची हक्काची असल्याचं मानलं जात आहे. दलित आणि मुस्लिमांची मतं मिळविण्यासाठी पटोले यांनी कंबर कसली आहे. मात्र, खैरलांजी प्रकरणामुळे पटोले यांच्याविरोधात दलित समाजात रोष असल्याने दलितांची मतं मिळण्यात पटोले यशस्वी ठरतात का? असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे.

२०१४ मध्ये गडकरी यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून २.४८ लाख मतांनी विजय मिळवला होता. गोंदीया-भंडारा लोकसभा मतदारसंघात पटोले यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना पराभूत केलं होतं. मात्र, पटोले यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे त्यांना नागपूरमधून काँग्रेसने तिकीट दिलं आहे. पटोले हे गडकरींनाही मात देणार का ? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागल्याचं दिसत आहे.

नागपूर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले की, “यावेळी देशात मोदींची लाट नाही. त्यामुळे दलित-मुस्लिम-कुणबी मतं आम्हालाच मिळतील अशी आशा आहे.” यापूर्वी काँग्रेसने १९९१ मध्ये दत्ता मेघे यांना नागपूरमधून तिकीट दिलं होतं. काँग्रेसने आता तब्बल २८ वर्षंनंतर काँग्रेसने नाना पटोले यांच्या रुपाने कुणबी समाजातील उमेदवाराला तिकीट दिलं आहे.

दरम्यान, ‘काँग्रेसचा डीएमके फॉर्म्युला यावेळी चालणार नाही. मतदार गडकरींनाच दुसऱ्यांदा विजयी करतील,’ असा दावा गडकरींचे निवडणूक प्रभारी सुधाकर देशमुख यांनी केला आहे. २०१४च्या आधीपर्यंत नागपूर हा काँग्रेसचाच गड राहिलेला आहे. या जागेवर भाजप उमेदवाराला केवळ दोनच वेळा विजयी होता आलं आहे. त्यामुळे यावेळी नागपूरचा गड कोण राखणार हे पाहणं औत्स्तुक्याचं ठरणार आहे.