बारामती विकासाच्या पॅटर्नबाबत मी कुणालाही चॅलेंज करते : सुप्रिया सुळे

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभांच्या प्रचारांचा धुरळा उडत आहे. प्रचारात आरोप-प्रत्यारोप आणि त्यात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणजे बारामती आणि तेथील राष्ट्रवादीच्या उमेदवार विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना बारामतीच्या विकास पॅटर्नबाबत खुलं चॅलेंज दिलं आहे. निवडणुका आल्या की विरोधक येतात, बारामतीत भाषणबाजी करतात. पण बारामतीच्या विकासाच्या पॅटर्नबाबत मी कुणालाही चॅलेंज करते, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. त्या प्रचारसभेत बोलत होत्या.

विरोधक आमच्यावर टीका करतात आणि निघून जातात. पुन्हा पाच वर्षे ते फिरकतच नाहीत. नुसती भाषणं करणं फार सोप असतं. या भागात विविध विकास कामं केली आहेत. बारामतीबद्दल या सर्व नेत्यांना प्रेम होतं तर एकाने तरी बारामतीचा दुष्काळी दौरा केलाय का, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना केला. बारामती लोकसभा मतदारसंघ आगामी पाच वर्षात टँकरमुक्त होण्यासाठी, तसंच भूगर्भातील पाण्याची पातळी कशी वाढेल, यासाठी प्रयत्न केला जाईल, असं आश्वासन सुप्रिया सुळे यांनी यावेळी नागरिकांना दिलं.

दरम्यान, ही लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे. परंतू कोणीच देशातील, राज्यातील महत्त्वाच्या विषयांवर बोलत नाहीत. टंचाई, बेरोजगारी, शेतकर्‍यांच्या पिकांना हमीभाव देण्याबाबत बोलण्याऐवजी नको त्याच गोष्टींवर राजकीय पक्ष भाषणबाजी करत आहेत, हे दुर्दैव आहे, असंही सुळे यांनी म्हटलं.