राजू शेट्टींना ‘नायक’ बनवण्यासाठी ‘खलनायक’ प्रकाश राज करणार प्रचार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रत्येक उमेदवार प्रचारासाठी जोर लावत आहे. काही उमेदवारांच्या प्रचारासाठी बॉलिवूडचे कलाकारही सहभाग घेताना दिसत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे हातकणंगले लोकसभा मतदार संघातील उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी चक्क टॉलिवूडचे स्टार अभिनेता आणि बॉलिवूडमध्ये गाजलेले खलनायक अभिनेते प्रकाश राज हे रिंगणात उतरणार आहेत.

राजू शेट्टींच्या प्रचारासाठी प्रकाश राज हे हातकणंगलेमध्ये जाहीर सभा घेणार असल्याची माहिती आहे. या सभा १९ किंवा २० एप्रिलला होण्याची शक्यता आहे. राजू शेट्टी महाराष्ट्रातीलच नाही तर देशपातळीवर झालेल्या शेतकरी आंदोलनात पुढे येत सहभाग घेतलेला आहे. त्यामुळेच प्रकाश राज हे शेट्टींच्या प्रचारासाठी येतील, अशी माहिती सुत्राकडून मिळाली आहे.

राजू शेट्टी यांनी हातकणंगलेत शेतकऱ्यांसाठी सतत आंदोलन आणि राजकारणात सक्रिय राहुन चांगला प्रभाव पाडला आहे. तसंच सेना-भाजपची युती झाल्याने हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. शिवसेनेनं डाव खेळत या जागेवर राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांचे सुपुत्र धैर्यशील माने यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. कारण राजू शेट्टींसाठी राष्ट्रवादीने ही जागा सोडली होती. मात्र शिवसेनेनं राष्ट्रवादीच्याच गोटातील उमेदवार तिथे दिला आहे.