हाय ना हिंमत ! मग उतरा ना रिंगणात…! : उदयनराजेंचे उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. राज्यात आज १४ मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. सातारा लोकसभा मतदार संघाचा देखील यात समावेश आहे. आज सकाळी राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला यावेळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उदयनराजे यांनी आपल्या अनोख्या अंदाजात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. ” हाय ना हिंमत ! मग उतरा ना रिंगणात…! उभे राहा सातारा मतदार संघातून” असे ओपन चॅलेंज त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना दिले. पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.

उद्धव ठाकरेंना उदयनराजेंचे ओपन चॅलेंज
प्रचाराच्या दरम्यान उद्धव ठाकरे इथे आले होते आणि त्यांनी तुमच्यावर टीका केली होती की तुम्ही संसदेमध्ये फार उपस्थित राहिला नाहीत किंवा फार काही प्रश्न विचारले नाहीत त्याबाबत काय सांगाल असा प्रश्न पत्रकाराने विचारल्यानंतर उदयनराजे म्हणाले, ” संसदेत मी काय करतो आणि काय नाही ते इथे येऊन बघावं त्यांच्याकडून पोचपावती घ्यायला ते काय रजिस्टार आहेत काय ? एवढेच जर असेल तर तुम्ही पुढच्या वेळी इथून उभे राहा ना ? जे जे कुणी अशी टीका करीत आहेत त्यांनी साताऱ्यातून उभं राहून दाखवावं. स्वतः कधी निवडणूकीला सामोरे जाणार नाही, नुसतं हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे अशा डरकाळ्या मारणार… हाय ना हिंमत ! मग उतरा ना रिंगणात…! “असे म्हणत उदयनराजे भोसले यांनी ओपन चॅलेंज ठाकरे यांना यावेळी बोलताना दिले.

सातारा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीकडून उदयनराजे भोसले तर भाजप-शिवसेना युतीकडून नरेंद्र पाटील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान आज तिसऱ्या टप्प्यात जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.