ज्या प्रदेशाध्यक्षांचं दिल्लीत कोणी ऐकत नाही, त्यांचं मी कसं ऐकणार ? – अब्दुल सत्तार

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचं पक्षात कोणीही ऐकत नाही, ते महाराष्ट्रात शब्द देतात. मात्र, दिल्लीतून त्यांचा शब्द फिरवला जातो. ज्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाचे दिल्लीत कुणी ऐकत नसेल तर मी कसे ऐकू असं काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. अब्दुल सत्तार हे अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात. काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षावर सत्तार यांनी भाष्य केलं आहे.

जनतेच्या दरबारात न्याय मागणार 

ADV

अब्दुल सत्तार म्हणाले की, ‘मला अशोक चव्हाणांवर टीका करायची नाही, मी त्यांना धन्यवाद देतो. नेत्यांच्या विरोधात बोलणं माझ्या तोंडी चांगल वाटत नाही. अशोक चव्हाणांचं पक्षात कोणीही ऐकत नाही, ते इथे शब्द देतात. मात्र, दिल्लीतून त्यांचा शब्द फिरवला जातो. ज्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाचेच दिल्लीत कुणी ऐकत नसेल तर मी कसे ऐकू ? छत्तीस वर्षे काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर न्याय मिळाला नाही याची खंत वाटतेय. त्यामुळे मी आता जनतेच्या दरबारात न्याय मागणार आहे. निवडणूकीनंतर काय करेल, कुठल्या पक्षात जाईल हे सांगता येत नाही. सध्यातरी अपक्ष लढणार आहे. येत्या काळात मुलाला सिल्लोड विधानसभेसाठी अपक्ष उभा करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.’

नाराज अब्दुल सत्तार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

औरंगाबादमधून तिकीट न मिळाल्याने काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले काँग्रेसचे नेते अब्दुल सत्तार यांनी पहाटे २ वाजण्याच्या सुमाराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले सत्तार हे पक्ष सोडण्याच्या मनःस्थितीत असून ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यांनी भाजप नेत्यांची भेट घेतल्याने ते इतर काँग्रेस नेत्यांप्रमाणे भाजपप्रवेश करणार अशी शक्यता व्यक्त होत असतानाच त्यांनी भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. औरंगाबाद काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून, हे सांगण्यासाठीच आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याचे सत्तार यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं औरंगाबादमधून सुभाष झांबड यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर सत्तार यांनी पक्षाविरोधात बंड केलं. सत्तार औरंगाबादमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होते.