‘या’ पक्षांनी दिली एवढ्या महिलांना लोकसभेची उमेदवारी

मुंबई – पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यातच काल भाजपच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी महिलांना संधी दिली जात नसल्याचा आरोप करत महिला प्रतिनिधीत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यामुळे निम्मी लोकसंख्या असूनही महिलांना योग्य प्रतिनिधीत्व मिळत नाही अशी परिस्थिती आहे. त्याचपार्श्वभूमिवर आपण आज कोणी किती महिला उमेदवार दिलेत हे पाहणार आहोत.

लोकसभा निवडणूकीत महिला उमेदवारांची संख्या ही बोटावर मोजण्याइतकीच आहे. राज्यात जवळपास ५० टक्के महिला मतदार आहेत. आकडेवारी पहायला गेल्यास राज्यात एकूण ८ कोटी ७० लाख मतदार आहेत. यापैंकी पुरूष मतदारांची संख्या ४ कोटी ५० लाख आहे तर महिला मतदार ४ कोटी २० लाख आहेत. मात्र, लोकसभेची उमेदवारी देताना सर्वच पक्षांनी पुरषांना अधिक संधी दिली आहे.

राज्यात सर्वांधिक महिला उमेदवार भाजपने दिले आहेत. भाजप २५ जागा लढवत असून त्यापैंकी ७ महिला उमेदवार दिले आहेत. तर काँग्रेस देखिल राज्यात २५ जागा लढवत असून केवळ ३ महिला उमेदवारांना संधी दिली आहे. राष्ट्रवादीने तर १९ जागांपैकी केवळ १ महिला उमेदवार दिली आहे. शिवसेनेनेही २३ जागांपैकी केवळ १ महिला उमेदवार दिली आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा महिलांना मिळणाऱ्या प्रतिनिधीत्वाचा प्रश्न चर्चेत आला आहे. भाजपने सर्वाधिक महिला उमेदवार देऊनही त्यांच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी आपली नाराजी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली होती. देशपातळीवर विचार केला तर ममता बॅनर्जी तसेच ओडिशामधील नविन पटनाईक सोडले तर कुणीही महिलांना स्थान दिलेलं नाही. ममता यांनी ४१ टक्के तर पटनाईक यांनी ३३ टक्के महिला उमेदवारांना संधी दिली आहे.