‘भगवान श्रीकृष्णानं दिलाय कोरोना’, ‘या’ काँग्रेस नेत्यानं COVID-19 साठी देवाला ठरवलं जबाबदार

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : उत्तराखंड कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सूर्यकांत धस्माना एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. वास्तविक सूर्यकांत धस्माना म्हणाले की भगवान श्रीकृष्णाने कोरोना पाठविला आहे. तसेच त्यांनी असे देखील म्हटले आहे की ‘क’ पासून कृष्ण आणि ‘क’ पासूनच कोरोना नाव तयार होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर मागील दोन दिवसांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यानंतर धस्मानांवर जोरदार टीका झाली आहे.

धस्माना यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केले आहे. सोबत त्यांनी श्रीकृष्ण आणि गीतेचा संदर्भ देत म्हटले आहे की, ‘गीतेमध्ये श्रीकृष्णाने म्हटले आहे की तो जगाचा निर्माता, अनुयायी आणि विनाशक आहे. त्यांनीच कोरोना दिला आहे.

टीकेनंतर सूर्यकांत धस्माना यांनी त्यांच्या विधानावर दिले स्पष्टीकरण

टीकेनंतर ते स्पष्टीकरण देताना म्हणाले, ‘मी असे म्हटले होते की भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की मी या सृष्टीचा निर्माता, अनुयायी आणि विनाशक आहे. मी माझ्या आयुष्यात, शब्दात, कृतीतून आणि व्यवहारात गीतेला नेहमीच महत्व देतो म्हणून मी नेहमीच गीतेमधील उदाहरण देतो. त्याचप्रमाणे जेव्हा कोरोनाचा संदर्भ आला, तेव्हा मी म्हणालो की कोरोना देवाच्या इच्छेविना आला आहे का? या जगात जे काही होईल, फायदा-तोटा, जीवन-मृत्यू हे सर्व देवाच्या हातात आहे. कुणीतरी याचे खंडन करावे. कुणीतरी तुलसीदासांनी सांगितलेल्या चौपाईचे खंडन करावे. मी हे म्हणत होतो, माहित नाही कशा पद्धतीनं याला हाताळले गेले.’

धस्माना यांनी चारधाम यात्रा सुरू करण्याच्या निर्णयावर प्रश्न उठवला होता. कोरोना संकटामध्ये धार्मिक कामे सुरू करण्यावर त्यांचा आक्षेप होता. उत्तराखंडमध्ये 1 जुलैपासून सुरू होणार्‍या चारधाम यात्रेसाठी एक मानक ऑपरेटिंग प्रक्रिया म्हणजेच एसओपी (SOP) जारी केली गेली आहे. या प्रवासात केवळ राज्यातील लोकच सहभागी होऊ शकतील. यासाठी ई-पास देण्यात येईल.