MP च्या शिक्षिकेनं ‘मुंडन’ करून राहुल गांधींना पाठवले ‘केस’, जाणून घ्या कारण

भोपाळ : वृत्तसंस्था – येथे मागील 72 दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करणार्‍या हंगामी शिक्षकांसाठी बुधवारचा दिवस खुपच भावुक करणारा ठरला. बुधवारी दुपारी आंदोलन करणार्‍या एका अतिथी शिक्षिकेने केस काढून सार्वजिनक पद्धतीने मुंडन करून घेतले. मुंडन करणार्‍या महिलेच नाव डॉक्टर शाहीन खान आहे.

मुंडन केल्यानंतर भावुक झालेल्या शिक्षिकेने म्हटले की, निवडणुकीनंतर अतिथि शिक्षकांना काँग्रेसने आश्वासन दिले होते की, आमचे सरकार स्थापन होताच मागण्या पूर्ण केल्या जातील. आम्ही एक वर्ष वाट पहिली आणि त्यानंतर जेव्हा आंदोलन सुरू केले तेव्हा अतिथी शिक्षकांना फॉलन आऊट नोटीसा मिळण्यास सुरूवात झाली. आम्ही येथे दोन महिन्यांपासून धरणे देत आहोत, परंतु सरकार कोणतीही दखल घेण्यास तयार नाही. आम्ही मुलांना शिकवून त्यांचे भविष्य घडवले, पण आमचे भविष्य अंधकारमय झाले आहे. यामुळे लेखी आर्डर मिळाल्याशिवाय आम्ही येथून उठणार नाही.

अतिथि शिक्षक नियमितीकरण संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष देवराज सिंह म्हणाले, यापेक्षा वाईट दिवस अतिथी शिक्षकांसाठी असू शकत नाही, कारण एका महिलेने आपल्या केसांचा त्याग केला आहे. डॉक्टर शाहीन यांनी केसांचे मुंडन केले आहेत ते आम्ही राहुल गांधी यांच्याकडे पाठवू. जेणेकरून त्यांना समजेल की, त्यांनी दिलेल्या आश्वासनाचे येथे पालन केले जात नाही.

महिला अतिथि शिक्षिकेने मुंडन केल्यानंतर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर ट्विट करत निशाणा साधला आहे. शिवराज सिंह चौहान यांनी कमलनाथ यांचे फेब्रुवारी 2018 चे एक जुने ट्विट शेअर करत लिहिले आहे की, आजसुद्धा केस हे स्त्रीचा सन्मान आहे. अतिथि शिक्षक बहिणींनी आपल्या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आपल्या केसांचा त्याग केला आहे, तुम्हाला त्यांच्या दुखाचा अंदाज आहे का? आज तुम्हाला राज्याची मान शरमेने खाली गेल्यासारखे वाटते का? त्यांचे भले होण्यासाठी तुम्ही काही पाऊल उचलाल?

जेव्हा शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री होते तेव्हा कमलनाथ यांनी एका महिला अतिथि शिक्षिकेच्या मुंडनानंतर शिवराज यांना घेरताना त्या घटनेला धक्कादायक म्हटले होते. अतिथी शिक्षकांना कायमस्वरूपी शिक्षक करण्यासाठी मध्य प्रदेशमधील अतिथि शिक्षक 2 डिसेंबर 2019 पासून आंदोलन करत आहेत, जे अजूनही सुरूच आहे.

You might also like