रायगड : महाड दुर्घटनेप्रकरणी इमारतीच्या दोन्ही बिल्डरवर FIR

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन – रायगड जिल्ह्यातील महाड येथे तारिक गार्डन नावाची ५ मजली इमारत सोमवारी सायंकाळच्या सुमारास कोसळून मोठी दुर्घटना घडली. यामध्ये आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला असून, सात जखमींवर महाड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही १८ ते १९ जण अडकल्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी इमारतीच्या दोन्ही बिल्डरच्या नावे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

फारुक काझी आणि युनूस शेख या दोन्ही बिल्डरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिल्डरव्यतिरिक्त महाड शहर पोलीस ठाण्यात आर्किटेक्टवरही गुन्हा नोंद झाल्याची माहिती मिळत आहे. आठ महिने ते एक वर्षाच्या आतमध्येच इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आलं होत. हे बांधकाम अतिशय निष्कृष्ट दर्जाचे असल्याची माहिती समोर येत आहे. म्हणून हा मनुष्यवधच आहे अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. सुरुवातीपासूनच या इमारतीच्या बांधकामाबाबत तक्रारी आल्याची धक्कादायक माहिती स्थानिक नागरिक आणि प्रत्यक्षदर्शी तसेच इमारत दुर्घटनेतून बचावलेल्या रहिवाशांनी दिली.

दरम्यान, इमारतीमध्ये ४५ फ्लॅट होते. ज्यातील १८ फ्लॅट रिकामे होते. इमारतीच्या ए विंग मध्ये ३० जण दुर्घटनेची चाहूल लागताच इमारतीतून बाहेर पडले. आठ जण बेपत्ता आहेत. तर बि विंग मध्ये ६० रहिवाशी राहत होते. यातील ५१ जण बाहेर पडले. तर ९ जण बेपत्ता आहेत. इतर दोन असे एकूण १८ ते १९ जण बेपत्ता असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

आता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा घटनास्थळी दाखल झाले असून, ते सतत बचाव कार्याचा आढावा घेत आहेत. घटनास्थळी ढिगारा उपसण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. रात्री एक वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची तीन पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी लगेचच मदत व बचाव कार्य सुरु केले. पहाटे पर्यत वरच्या दोन मजल्यांचा ढिगारा उपसण्यात आला आहे.