ठाकरे सरकारवर नाराज असलेले पोलिस महासंचालक सुधोब जैस्वाल केंद्राच्या सेवेत जाणार, जाणून घ्या प्रकरण

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल (dgp-subodh-jaiswal) हे राज्यातील ठाकरे सरकारवर नाराज आहेत. त्यामुळे ते पुन्हा केंद्राच्या सेवेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. जैस्वाल यांनी या संदर्भात मुख्यमंत्री (Chief Minister Uddhav Thackeray) आणि गृहमंत्र्याकडे ( home minister Anil Deshmukh) विनंती केली होती. त्यांची ही विनंती मान्य करण्यात आली आहे.

सप्टेंबर महिन्यात जवळपास 50 वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर कनिष्ठ स्तरावरील कर्मचा-यांच्या बदल्या झाल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीजीपीच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत या बदल्या करण्यात आल्या. यामुळे नाराज डीजीपी जैस्वाल यांनी महाराष्ट्र सोडण्याचा निर्णय घेतला आहे. RAW मध्ये काम केलेल्या जैस्वाल यांना नॅशनल सिक्योरिटी गार्ड (NSG) चे डीजी म्हणून पोष्टींग मिळू शकते.

जैस्वाल हे केंद्र सरकारमधून मुंबईत आले होते. तीन वर्षापू्र्वी ते मुंबईचे आयुक्त होते. त्यांना बढती मिळाली आणि ते राज्याचे महासंचालक झाले. सरकार आणि जैस्वाल यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरु होता. काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या बदल्या झाल्या. यावेळी त्या बदल्या आपण होऊ देणार नाही, असा पवित्रा जैस्वाल यांनी घेतला होता. मात्र आता राज्य सरकारसोबत पटत नसल्याने त्यांनी पुन्हा केंद्रात जाण्याचा निर्णय घेतला आहे. जैस्वाल केंद्रात गेल्यानंतर राज्यातील पोलीस महासंचालकपद रिक्त होणार आहे.