शरद पवार विरोधात बसण्यावर ‘ठाम’, सत्तास्थापनेसाठी शिवसेनेचा मार्ग ‘खडतर’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम असताना संजय राऊत यांनी सिल्व्हर ओक येथे जाऊन शरद पवारांची भेट घेतली. दहा मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, या भेटीदरम्यान महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणावर चर्चा झाली. यावेळी शरद पवारांनी राज्यात असलेल्या अस्थिर वातावरणावर चिंता व्यक्त केल्याचे देखील संजय राऊत यांनी सांगितले.

लवकरात लवकर सत्ता स्थापन व्हावी असे शरद पवारांना वाटत असल्याचे देखील राऊत यांनी यावेळी सांगितले तसेच जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे असेही पवार यावेळी म्हणाले असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

या भेटीपूर्वी देखील संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असल्याचे स्पष्ट केले होते. भाजपला उद्देशून बोलताना राऊत यांनी सांगितले की, जे ठरलं आहे ते भाजपने करावे जर कोणी राष्ट्रपती राजवट लावण्याचे षडयंत्र रचत असेल तर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यावर अपमान असेल असे देखील राऊत म्हणाले.

या भेटीपूर्वी अहमद पटेल आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात देखील भेटीदरम्यान अर्था तास चर्चा झाली. अहमद पटेल हे काँग्रेसचे चाणक्य मानले जातात. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मात्र या भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे बोलले जात आहे.

शरद पवारांनी देखील सोमवारी दिल्लीमध्ये सोनिया गांधींची भेट घेतली होत. मात्र यावेळी काँग्रेस शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत अनुकूल नसल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. शरद पवारांनी विरोधात बसण्याचे ठरवले असल्याने शिवसेनेसाठी सत्तेसाठीचा मार्ग अजून खडतर होणार आहे.

Visit : Policenama.com