भाजप-शिवसेनेत ‘युती’ असली तरी स्थानिक स्तरावर ‘कार्यकर्त्यांकडून’ अपक्ष उमेदवारांचा ‘प्रचार’

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणूकांच्या प्रचाराचा धुमधडाका सुरु झाला, भाजप-शिवसेना युती झाली, परंतू कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम मतदारसंघात दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये फूट पाहायला मिळत आहे. युती झाल्याने कल्याण पश्चिमची जागा शिवसेनेला सोडण्यात आली, यामुळे नाराज भाजप विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांनी अपक्ष निवडणूकीच्या मैदानात उतरत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

तर कल्याण पूर्व मतदारसंघ भाजपच्या वाटेला आला आहे. येथे गणपत गायकवाड यांना भाजपकडून उमेदवारी घोषित करण्यात आली. मागील 2 कार्यकाळ गणपत गायकवाड या मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून येत होते. परंतू यंदा त्यांना भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढण्याची संधी मिळाली.

कल्याण पूर्व आणि पश्चिममधून शिवसेनेला जागा सोडण्यात यावी अशी मागणी शिवसैनिकांची होती. मात्र एकच जागा शिवसेनेना मिळाली, कल्याण पश्चिम मतदारसंघातील शिवसेनेकडून ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ भोईर यांना उमेदवारी देण्यात आली.

विश्वनाथ भोईर कल्याण पश्चिममधून युतीचे अधिकृत उमेदवार आहेत परंतू भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते अपक्ष उमेदवार असलेले नरेंद्र पवार यांचा प्रचार करत आहेत. यात भाजप उपमहापौर, नगरसेवक यांचा समावेश आहे. येवढंच काय तर अपक्ष उमेदवार नरेंद्र पवार यांच्या प्रचार बॅनरवर दिवंगत भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांचे फोटो झळकत आहे. यामुळे युतीत फूट दिसून येत आहे. शिवसेनेचे पश्चिमेतील शिवसैनिक देखील या प्रकारामुळे नाराज आहेत.

कल्याण पूर्व मतदारसंघात देखील युतीत सर्व काही अलबेल असल्याचे दिसत नाही. पूर्वेतून शिवसेनेचे नगरसेवक धनंजय बोडारे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. बोडारे यांना शिवसैनिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. युतीचे अधिकृत उमेदवार गणपत गायकवाड यांच्या प्रचारापेक्षा धनंजय बोडारे यांच्यासोबत कार्यकर्ते प्रचार करत होते. त्यामुळे राज्यात पक्षांची युती झाली असली तर स्थानिक स्तरावर मात्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी युती स्विकारल्याचे दिसत नाही.

visit : Policenama.com