अजित पवारांचं नारायण राणेंना ‘ओपन’ चॅलेंज, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्याच्या काळात सगळे आमदार पक्षासोबत राहतील. एखाद्या पक्षातील आमदार फुटला आणि त्याठिकाणी निवडणुका लागल्या तर ज्या पक्षाचा आमदार फुटला त्याच पक्षाचा उमेदवार उभा राहील आणि अन्य दोन पक्ष त्याला पाठिंबा देतील. जर असं झालं तर 3 पक्षाचा पाठिंबा असलेल्या उमेदवाराला कोणीच हरवू शकत नाही असं आव्हान अजित पवारांनी नारायण राणेंना दिलं आहे.

आपल्याला सत्ता स्थापन करायची आहे, कामाला लागा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितलं असून सत्ता स्थापन करण्याची जबाबदारी माझ्या खांद्यांवर टाकली आहे. त्यामुळे भाजपची सत्ता येण्यासाठी मला जे काही करता येईल ते करेल असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं होत. त्यामुळे बहुमतासाठी 145 आमदार जुळविताना नारायण राणेंना इतर पक्षातील आमदार फोडावे लागतील हे चित्र स्पष्ट आहे.

नारायण राणेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, ‘नारायण राणेंच्या वक्तव्याला किती गांभीर्याने घ्यायचं हा प्रश्न आहे, सध्याच्या काळात सगळे आमदार पक्षासोबत राहतील, जर एखाद्या पक्षातील आमदार फुटला, त्याठिकाणी निवडणुका लागल्या तर ज्या पक्षाचा आमदार फुटला त्याच पक्षाचा उमेदवार उभा राहील आणि अन्य दोन पक्ष त्याला पाठिंबा देतील. जर असं झालं तर 3 पक्षाचा पाठिंबा असलेल्या उमेदवाराला कोणीच हरवू शकत नाही. ‘

कोणत्याही पक्षाला बहुमत सिद्ध करता न आल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. मात्र युती व आघाडीतील पक्षांना सत्तास्थापनेची संधी असल्यानं जुळवाजुळव सुरूच राहणार आहे.

काय म्हणाले होते राणे –

शिवसेनेने त्यांना मूर्ख बनवणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ओळखावं. जेव्हा भाजपा राज्यपालांकडे जाईल तेव्हा 145 आमदारांची यादी हातात घेऊन जाईल आणि सत्ता स्थापन करेल. रिकाम्या हाती आम्ही जाणार नाही. आपल्याला सत्ता स्थापन करायची आहे, कामाला लागा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितलं असून सत्ता स्थापन करण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर दिली आहे. मी भाजपमध्ये आहे. त्यामुळे भाजपची सत्ता येण्यासाठी मला जे काही करता येईल ते करेल.

Visit : Policenama.com