महाशिवआघाडीचे ‘हे’ 4 नेते मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत, कोण बनणार CM ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील विधानसभेचा निकाल येऊन 20 दिवस होऊन गेले तरी अजून राज्यातील राजकीय घोळ कायम आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रिपदावरुन वाद सुरु झाल्यानंतर युतीच तर बिनसलं पण महाशिवआघाडीची गणिती जुळायला लागली. सध्या राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना सत्तास्थापनेच्या समीकरणाची गणिते जुळवताना दिसत आहेत परंतू या तिन्ही पक्षांपैकी मुख्यमंत्री कोणाचा तसेच सत्तावाटप यावर अजून संभ्रम दिसत आहे. या दरम्यान मुख्यमंत्रिपदासाठी 4 नेत्यांची नावे आघाडीवर असल्याचे दिसत आहेत.

भाजपने तर निवणडूकीत सर्वाधिक जागा जिंकल्या खऱ्या परंतू सत्तास्थापनेच्या रेसमध्ये पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा करण्यात भाजप अपयशी ठरले. त्यामुळे दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला संधी मिळाली परंतू वेळेत पाठिंबा असल्याचा दावा करण्यात ते ही असमर्थ ठरले. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. परंतू महाशिवआघाडीतील नेत्यांनी सांगितले की आम्हाला आता चर्चा करायला जास्त कालावधी मिळाला आहे. या तिन्ही पक्षांची सत्तासमीकरणं जुळली तर तब्बल 20 वर्षांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेचे तीन तर राष्ट्रवादीच्या एका नेत्याचे नाव चर्चेत आहे.

1 आदित्य ठाकरे –

आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि ते निवडून आले. ठाकरे घरातील पहिल्या व्यक्तीने निवडणूक लढवली आहे. निवडणूक दरम्यान आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेकडून वारंवार प्रोजेक्ट करण्यात आले. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवा अशी शिवसेनेतील अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे. परंतू निवडणूक पार पडल्यानंतर आदित्य ठाकरेंना प्रोजेक्ट करणं कमी झालं. कारण युतीच बिनसल्याची चिन्ह दिसत असताना सत्तास्थानपेसाठी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मदत घेत आहे. त्यामुळे अनेक दिग्गज नेते असताना नवख्या आदित्य ठाकरेंना संधी मिळणार की नाही या बाबत प्रश्न चिन्ह आहे.

2. एकनाथ शिंदे –

ठाणे जिल्ह्यातील राजकारणात शिवसेनेची पकड निर्माण करण्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची मोठी मेहनत आहे. पक्षात देखील त्यांचे चांगले वजन आहे. अनेक आमदारांशी त्यांचे वैयक्तिक चांगले संबंध आहेत. मागील युती सरकारमध्ये ते मंत्री देखील होते. शिवसेनेतील कामामुळे पक्षांने त्यांना विधीमंडळ गटनेते पदाची जबाबदारी देखील दिली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांचे नाव आघाडीवर नक्कीच आहे.

3. उद्धव ठाकरे –

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यात याचमुळे फिसकटले कारण मुख्यमंत्रिपदावर भाजपकडून शिवसेनेला स्पष्टता मिळत नव्हती. उद्धव ठाकरेंनी सांगितले की शिवसेनेचा मुख्यमंत्री बसणार असे वचन आम्ही दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना दिले आहे. तसेच महाशिवआघाडीचे सरकार स्थापन झाल्यास मुख्यमंत्रिपदावर उद्धव ठाकरे देखील असू शकतात. याचे कारण आहे की या तिन्ही पक्षात इतके दिग्गज नेते असताना तसेच तीन पक्ष एकत्र असताना निर्णय प्रक्रियेत जास्त वजन असलेला नेता असणे आवश्यक आहे.

4. अजित पवार –

विधानसभा निवडणूकीत शिवसेनेनंतर सर्वात जास्त जागा कोणत्या पक्षाकडे आहे तर तो आहे राष्ट्रवादी काँग्रेस. राष्ट्रवादीकडे 54 जागा आहेत तर शिवसेनेकडे 56 जागा. त्यामुळे हा फरक जास्त नाही. तसेच अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला तर मुख्यमंत्रिपदावर राष्ट्रवादीकडून अजित पवार देखील दावेदार असू शकतात. तसेच त्यांच्याकडे पक्षाने विधीमंडळ पक्षनेता पदाची धूर देखील सोपावली आहे.

Visit : Policenama.com