सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत होणार !

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन –   गुरुवारी (दि.2) पुणे येथे बोलताना मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कर्ज काढावे लागेल, असे सांगितले होते. आज यु टर्न घेत वडेट्टीवार यांनी राज्याची परिस्थीती बेताची असली तरी सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत होईल असे स्पष्टीकरण दिलं आहे. ते आज (शुक्रवार) कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक परिस्थिती कितीही बेताची असली तरी पोलीस, आरोग्य कर्मचारी या कोरोना योद्ध्यांच्या पगारात कपात होणार नाही. तसेच त्यांचे पगार वेळेवरच होतील, असा खुलासा त्यांनी केला. महापुरानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील मदत व पुनर्वसन कामांसह कोरोना संसर्गावरील उपाययोजनांचा त्यांनी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला. आढावा बैठकिनंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.

विजय वडेट्टीवार म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याने कोरोना संसर्ग नियंत्रणात ठेवून मृत्यू दर कमी ठेवण्यात यश मिळवले. कोरोनाच्या विरोधातील लढाईत पोलीस, आरोग्य यंत्रणा यांचे योगदान मोलाचे आहे. संसर्गामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती कोलमडली असली तरी, कोरोना योद्ध्यांचे पगार विनाकपात आणि वेळेत करण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. मात्र, कोरोना योद्ध्यांनी पगाराबाबत चिंता करू नये, असे त्यांनी म्हटले आहे.

पुण्यात काय म्हणाले होते वडेट्टीवार ?

पुढील महिन्यात पगार देण्यासाठी राज्य सरकारला कर्ज काढण्याची वेळ पडेल अशी परिस्थिती आहे. मात्र, जे कोरोनासाठी काम करत आहेत त्यांचा पगार व्यवस्थित होईल. परंतु इतरांबाबतीत थोडसं मागे पुढे होऊ शकतं. चार महत्त्वाचे विभाग वगळता इतर विभागामधे काटछाट करण्याची वेळ येऊ शकते, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे