…म्हणून पार्थला दिली उमेदवारी, शरद पवारांनी सांगितले ‘सिक्रेट’

मावळ : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पूर्वी माढा मतदार संघातून लढणार होते. मात्र त्यांनी लोकसभेतून माघार घेतली आणि पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याचे ठरवले. पण त्यांनी पार्थला उमेदवारी देण्याचे का ठरवले ? याचे सिक्रेट सांगितले. ‘महाराष्ट्रातील लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची जबाबदारी ही आमची आहे आणि त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तरुणांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आपल्या हिताची जपणूक करण्यासाठी या तरुणांना संधी दिली आहे,’ असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवारांच्या मावळमधील उमेदवारीचं समर्थन केलं आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये मावळ लोकसभा मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मावळात राष्ट्रवादी नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर भाजप-सेना युतीकडून श्रीरंग बारणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आपल्या मुलाला निवडणुकीत जिंकवून आणण्याकरीता अजित पवार सर्वोतोपरी प्रयत्न करीत असल्याचे पहायला मिळत आहे. आता शरद पवारांनी देखील ‘मतदारांनी खंबीरपणे पार्थ यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मतदान करावं,’ असं आवाहन शरद पवारांनी मावळमधील प्रचारसभेत केलं आहे.

शेतकऱ्यांचे जीवन बदलले का ?
‘नरेंद्र मोदी प्रत्येक सभेमध्ये सांगतात, काय केलं काँग्रेसने. पाच वर्ष तुमच्या हातात सत्ता होती, शेतकऱ्यांचे जीवन बदलणार, असं सांगितलं होतं. शेतकऱ्यांचे जीवन बदललं का? मोदींची सत्ता आल्यानंतर महाराष्ट्रात एकही नवीन औद्योगिक वसाहत सुरू झाली नाही. आमच्याकडे सत्ता असताना संपूर्ण महाराष्ट्रात अनेक जागी औद्योगिक वसाहती काढल्या,’ असा हल्लाबोल शरद पवार यांनी सरकारवर केला आहे.