शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये वाढला ‘तणाव’ ! 2 दिवसापूर्वी केलेल्या मुंबईतील 10 पोलीस उपयुक्तांच्या बदल्यांचे आदेश रद्द

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  महाराष्ट्रातील सत्ताधारी मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संघर्ष वाढत चालल्याचे दिसून येत आहे. पोलिसांच्या बदलीच्या प्रकरणावरून त्यांच्यात वाद वाढले आहेत. रविवारी 2 जुलै रोजी मुंबईच्या पोलीस आयुक्त कार्यालयाने 10 पोलीस उपायुक्तांच्या (DCP) बदलीचे आदेश रद्द करण्याचे आदेश जारी केले आहेत.

मुंबईतील पोलीस उपायुक्तांच्या बदलीचे आदेश 2 जुलै रोजी काढण्यात आले होते. यामध्ये परिमंडळ आणि गुन्हे शाखेतील आणि काही उपायुक्तांच्या विशेष शाखेतून परिमंडळमध्ये बदल्या केल्या होत्या.
मुख्यमंत्री कार्यालयाला माहिती नाही.

पोलीस उपायुक्तांच्या बदल्या केल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाला नसल्याने पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वादाला तोंड फुटले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, बदलीचे आदेश गृह विभागाने मंजूर केले होते. मात्र, मुख्यमंत्री कार्यालयाला विश्वासात घेण्यात आले नव्हते. या घटनाक्रमाशी संबंधित सुत्रांनी सांगितले की, बदलीबाबत मुख्यमंत्री कार्यालयाला काहीच माहिती देण्यात आली नव्हती आणि गृहखात्याने त्याला मंजूरी दिली. महाराष्ट्रात गृह मंत्रालय राष्ट्रवादी काँग्रेसकडे असून अनिल देशमुख हे गृहमंत्री आहेत.
रविवारी दुपारी सह पोलीस आयुक्त, प्रशासन आणि पोलीस आयुक्तांचे प्रशासकीय अधिकारी यांच्या स्वाक्षरीने राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे 2 जुलै रोजीचे बदलीचे आदेश रद्द करण्यात आले. केंद्रीय प्रतिनियुक्तीवर आलेल्या पोलीस आयुक्त अभिनश कुमार आणि नियती ठक्कर देव यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. त्यांचा पदभार डीसीपी एन अंबिका आणि प्रणय अशोक यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

दरम्यान, या आदेशामुळे राज्यातील सत्ताधारी मित्रपक्षांमध्ये वाद निर्माण झाला आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून रविवारी दुपारी देण्यात आलेल्या सूचनांनुसार बदलीचे आदेश तातडीने रद्द करण्यात आले. बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तातडीने आपल्या पहिल्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले.
हे प्रकरण CM च्या निदर्शनास आणून दिले

राज्यात शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ मंत्र्यांनी सांगितले की, हे बदलीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर पोलिसांच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश रद्द करण्यात आले.
2 जुलै रोजी जारी केलेल्या आदेशात 10 पोलीस उपायुक्तांची बदली करण्यात आली होती. त्यापैकी 8 जणांच्या बदलीचे आदेश रविवारी रद्द करण्यात आले आहेत. तर केंद्रीय प्रतिनियुक्तिवर गेलेले दोन पोलीस उपायुक्तांना यातून वगळण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश आणि आता त्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश रद्द केल्यामुळे त्यांची बदली का करण्यात आली असा संभ्रम निर्माण झाला आहे.