अरे देवा ! दारूच्या दुकानासमोर लाईनमध्ये उभ्या असलेल्या तळीरामांवर मधमाशांचा ‘हल्ला’, एकाचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : देशातील बर्‍याच राज्यात दारूची दुकाने उघडली आहेत आणि या दरम्यान वेगवेगळ्या घटना देखील समोर येत आहेत. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात दारू घेण्यासाठी ओळीत उभ्या असलेल्या एका व्यक्तीवर मधमाश्यांनी हल्ला केला आणि उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. यानंतर गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

पुण्याच्या देहू गावात सोमवारी मोठ्या संख्येने लोक दारूच्या दुकानाच्या बाहेर दारू विकत घेण्यासाठी एका ओळीत उभे होते. बर्‍याच तासांपर्यंत ओळीत उभे राहिल्याने लोकांना थकवा आला होता, त्यामुळे धक्काबुक्की आणि बाचाबाची होऊ लागली. यानंतर लोकांनी पोलिसांना तेथे बोलावले. या दरम्यान दुकान मालकाने शटर खाली ओढले. दारूचे दुकान बंद होताच लोक संतप्त झाले. आणि या दरम्यानच मधमाशांच्या पोळ्यावर कुणीतरी वीट मारून फेकली. यानंतर दुकानात उभ्या असलेल्या सर्व लोकांवर मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्यानंतर लोक सैरावैरा करत पळत सुटले आणि या गोंधळात पाच लोक गंभीररित्या जखमी झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींमध्ये एक 41 वर्षीय व्यक्तीचा समावेश होता, जो मधमाशांच्या हल्ल्याचा बळी ठरला. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथेच त्याचा मृत्यू झाला. त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.