‘अभी तो मैं जवान हूं’ : शरद पवार (व्हिडिओ)

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र चुकीच्या हातातून काढून घेणे ही माझी जबादारी आहे. राज्यातील युतीचे सरकार उलथवून टाका आणि हे सरकार घालविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी ‘अभी तो मैं जवान हूं’ चिंता करण्याचं कारण नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. राधानगरी-भुदरगड मतदारसंघातील उमेदवार के. पी. पाटील यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

प्रचारसभेत बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘ए. वाय. पाटील, के. पी. पाटील, सतेज पाटील ही सगळी मंडळी मनापासून कामाला लागली आहेत. त्याचा मला आनंद आहे. पण त्यांची एक गोष्ट मला आवडली नाही. तिघांनाही सांगतो मला 80 वर्षांचा म्हणू नका. आता मी काय म्हातारा झालोय? या राज्यातून शिवसेना-भाजपचं सरकार घालवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी ‘अभी तो मैं जवान हूं’. चिंता करण्याचं कारण नाही. पवार यांच्या वक्तव्यावरून सभेत एकच हशा पिकला.

सरकारवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, ‘राज्यातील जनतेने मला 14 वेळा निवडून दिले. सात वेळा विधानसभा, तर सातवेळा लोकसभेत गेलो. चार वेळा मुख्यमंत्री केले. देशाचा कृषिमंत्री, अन्नमंत्री, संरक्षणमंत्री केले. महाराष्ट्रानं मला सगळं दिलंय. त्यामुळेच आता महाराष्ट्र चुकीच्या हातातून काढून घेणे ही माझी जबादारी आहे. राज्यातील युतीचे सरकार उलथवून टाका. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहे. ठिकठिकाणी गर्दीचा उच्चांक होत आहे. या सर्वांतून एकच जाणवतंय ते म्हणजे राज्यातील जनतेला परिवर्तन हवे आहे. महाराष्ट्राच्या काही भागांत नुकताच महापूर येऊन गेला. अशावेळी लोकांना धीर देण्याचे काम सरकारच्या प्रतिनिधींनी करणे आवश्‍यक होते, मात्र ते हवाई पाहणी करून गेले. जनतेच्या दु:खाची त्यांना जाणीव नाही.’

शरद पवार अजित पवारांना म्हणतात – ‘अरे मी काय म्हातारा झालो का?’
अरे मी काय म्हातारा झालो का? असा सवाल यापूर्वी शरद पवार यांनी अजित पवार यांना केला होता. साहेबांचं आता वय झालं असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्या वक्तव्याची फिरकी घेत शरद पवार यांनी हे विधान केले होते.

Visit : Policenama.com