भाजप उमेदवार डाॅ. सुजय विखेंचा लग्नपत्रिकेतून प्रचार करणारा नवरदेव ‘गोत्यात’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – लग्नपत्रिकेद्वारे सुजय विखेंचा प्रचार करणे निघोज येथील फिरोज शेख या उच्चशिक्षित तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. ‘आहेर नको पण सुजय विखे यांना मत द्या’ , असे आवाहन लग्नपत्रिकेद्वारे करणाऱ्या फिरोज शेख या तरुणावर पोलिसांनी कारवाई केली आहे. फिरोजने केलेले हे कृत्य आचारसंहितेचे उल्लंघन करणारे असल्याने उपजिल्हाधिकारी श्री. पाटील तसेच पारनेरचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांच्या आदेशान्वये फिरते पथक अधिकारी शान मोहंमद शेख यांनी फिरोजविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली.

फिरोज याचा विवाह ३१ मार्च रोजी प्रवरानगर येथे पार पडला. या विवाहासाठी शेख यांनी छापलेल्या पत्रिकेमध्ये ‘किसी भी तरह का तोहफा मत दिजीए, मगर अपने सुनहरे कल के लिए डॉ. सुजय दादा विखे पाटीलजी को जरूर वोट दिजीए’ अशी विनंती करण्यात आली होती. या पत्रिकेची सोशल मीडियात तसेच जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली होती. याची दखल घेत लोकसभा निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या आचारसंहिता कक्षातील अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्या चौकशीत आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पारनेर पोलिस ठाण्यात फिरोज याच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिस पथकाने तात्काळ कारवाई करीत फिरोजला अटक केली. नंतर पारनेर न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.