रेल्वेच्या ‘ओव्हरहेड’ वायरवर ‘डोकं’ फिरलेल्या युवकानं सुरू केले ‘कारनामे’, पुढं झालं ‘असं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगात असेही काही लोक असतात जे आपल्या कारनाम्यांमुळे स्वतः सोबत दुसऱ्याचाही जीव धोक्यात घालतात. मध्यप्रदेशातील एका रेल्वे स्थानकावर याचीच प्रचिती येणारी एक घटना घडली आहे. डाबरा येथील एका रेल्वे स्थानकावर रेल्वे साठी लावण्यात आलेल्या तारांवर एक तरुण चढल्याचे पहायला मिळाले. यामुळे रेल्वेच्या आवा गमनावर मोठा परिणाम झाला तसेच याठिकाणी लोकांची मोठी गर्दीही जमा झाली.

सुदैवाने त्यावेळी तारांमध्ये वीजप्रवाह सुरु नव्हता मात्र यामुळे त्या ठिकाणी मोठी गर्दी जमा झाली. रेल्वे प्रशासनाला याबाबत समजताच प्रशासनाने त्या तारांमध्ये वीज प्रवाह सुरु होणार नाही याची खबरदारी घेतली आणि पोलिसांना पाचारण केले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी एक रेल्वे इंजिन मागवले आणि मोठ्या प्रयत्नाने त्या तरुणाला खाली उतरवले.

तारांवर चढलेल्या त्या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. डाबरा रेल्वे स्थानकावरील हा सर्व धक्कादायक प्रकार आहे. या तरुणाच्या कारनाम्यामुळे चार रेल्वे गाड्या ठप्प झाल्याची माहिती वाणिज्य प्रबंधक अखिल शुक्ला यांनी दिली.

Visit : Policenama.com