क्रूरतेचा कळस ! मांजरीच्या पिल्लांना फेकलं आगीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईतील मीरा रोड परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने मांजरीच्या दोन पिल्लांना आगीत फेकल्याची घटना घडली आहे. क्रूरपणे मांजरीच्या पिल्लांना आगीत फेकणाऱ्या तरुणाचे सिद्धेश पटेल असे नाव आहे. शनिवारी रात्री सिद्धेशने आग लावली आणि या आगीत मांजरीच्या पिलांना फेकले. याप्रकरणी सिद्धेशला अटक केली होती मात्र काही वेळातच त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

याबाबत मिळलेली अधिक माहिती अशी की, मीरा रोड परिसरातल्या भक्ती पार्कमधील अजमल रमा हाऊसिंग सोसायटीतील रहिवाशांनी दोन महिन्यांच्या पिल्लांना त्यांच्या आईसोबत एका पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये ठेवलं होतं. पण रविवारी ही पिल्लं त्यांना जखमी अवस्थेत दिसली. आगीत भाजल्यामुळे या पिल्लांना जखमा झाल्या होत्या. या प्रकरणाबाबत संशय आल्याने सीसीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले तेव्हा मात्र सिद्धेशचे कृत्य समोर आले.

या फुकटेजमध्ये सिद्धेश माचिसच्या साहाय्याने पुठ्ठ्याच्या बॉक्सला आग लावताना स्पष्ट दिसले. हे कृत्य त्याने रात्री २. ३० वाजण्याच्या सुमारास केले. सीसीटीव्हीत आरोपी सिद्धेश मांजरीच्या पिल्लांना उचलून आगीत फेकत असल्याचेही स्पष्ट दिसत होते. आगीत होरपळल्याने मांजरीच्या पिल्लांनी पळ काढला. इमारतीमधील रहिवासी फर्नांडिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बॉक्स दुसऱ्या बाजूने उघडा असल्याने मांजरी पळ काढू शकल्या’.

दरम्यान सिद्धेशचा मांजरींना विरोध होता असे तेथील रहिवाशांनी संगितले. मात्र इतके क्रूर कृत्य केल्यामुळे या तरुणांबद्दल सर्वत्र राग व्यक्त करण्यात येत आहे.