… तर मराठा तरूण नक्षलवादाच्या मार्गावर जातील, संभाजी ब्रिगेडचा इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर अध्यादेश काढून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सुरु असलेल्या राजकारणाचा मराठा आरक्षण बळी ठरत आहे. पण आम्ही ५० कार्यकर्त्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. प्रसंगी आरक्षणासाठी रस्त्यावर उतरु, असे सांगत असतानाच आरक्षण न मिळाल्यास मराठा तरुण नक्षलवादाच्या मार्गावर जातील, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला.

संभाजी ब्रिगेडने मराठा आरक्षण बाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी बोलताना संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण प्रकरणाची बाजू मांडण्यास राज्य सरकार कमी पडले. म्हणून राज्य सरकारने आपली चूक सुधारुन तात्काळ कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढावा. राम मंदिर, तीन तलाक आणि काश्मीर बाबत केंद्र सरकार पुढाकार घेते, मग मराठा आरक्षणासाठी का घेत नाही ? मराठा आरक्षण हा देखील श्रद्धा आणि आस्थेचा विषय असून केंद्र आणि राज्य सरकारने आपल्या राजकारणात मराठा आरक्षणाचा बळी देऊ नये, असे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केलं.

कायद्याच्या कसोटीवर टिकणार आरक्षण द्यावे

केंद्रातील भाजप सरकारच्या नाकावर टिच्चून महाराष्ट्रत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. मात्र, राज्यातील सरकार सत्तेत कसे आलं, त्यात आम्हाला पडायचं नाही. पण तुमच्या राजकारणासाठी आमचा बळी देऊ नये. कायदाच्या कसोटीवर टिकणार आरक्षण देण्याची जबाबदारी जशी सत्ताधाऱ्यांची आहे, तसेच विरोधकांनी सुद्धा पुढे येऊन या कामी समन्वय राखावा. महाविकास आघाडीने आणि विरोधी पक्षाने केंद्राकडे आरक्षणाचा पाठपुरावा केला तर आरक्षण मिळण्यात अडचण निर्माण होणार नाही, असं सुद्धा संभाजी ब्रिगेडने सांगितलं.

दरम्यान, मराठा आरक्षण हा मराठा तरुणांच्या भविष्याचा प्रश्न असून, तो सुटला नाहीतर मराठा तरुण नक्षली मार्गाकडे वळतील अशी भीती, संभाजी ब्रिगेडने व्यक्त केली. तसेच तरुणांनी व्यथित होऊन आरक्षणासाठी आत्महत्येचा मार्ग अवलंबू नये. तुमच्या अडचणी आमच्याकडे मांडा. तुमच्या हाताला रोजगार देण्याचं काम आम्ही करु. पण कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करु नका, असे आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले.