अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या संपत्तीत ५ वर्षात ३४ कोटींची वाढ !

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री हेमा मालिनी भाजपकडून लोकसभेच्या रिंगणात आहेत. त्यांनी बुधावारी उमेदवारी अर्ज भरला. या अर्जामध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची १०१ कोटींची संपत्ती असल्याचे घोषित केले आहे.

प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ५ वर्षात त्यांची मालमत्ता ३४ कोटींनी वाढली आहे. हेमा मालिनी १०१ कोटी रुपयांच्या संपत्तीच्या मालक आहेत. हेमा मालिनी यांच्या मालकीची एकूण मालमत्ता १ अब्ज, १ कोटी, ११ लाख, ९५ हजार ३०० रुपये आहे. तर त्यांच्या बँक खात्यातील ठेवी, रोख आणि दागिन्यांची रक्कम १३ कोटी २२ लाख ९६ हजार ९४५ रुपये आहे. २०१४ मध्ये हेमा मालिनींची मालमत्ता ६६ कोटींची होती.

धर्मेंद्र यांची संपत्ती १२.३० कोटी रुपयांनी वाढली

प्रतिज्ञापत्रानुसार, गेल्या ५ वर्षांत धर्मेंद्र सिंह देओल यांच्या मालमत्तेची किंमत १२.३० कोटी रुपयांनी वाढली आहे. यात काही रक्कम त्यांना कोणालातरी देणे आहे. आयकर विभागाकडे सादर केलेल्या कर विवरणानुसार, हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची एकत्रित मालमत्ता गेल्या पाच वर्षांत दरवर्षी १० कोटींनी वाढली आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी ९.८७ कोटी रुपयांची मालमत्ता घेतली आहे. त्याच काळात पती धर्मेंद्र यांनी ९.३७ कोटी रुपयांची मालमत्ता घेतली आहे.