केडगाव परिसरात मटका माफियांचे पोलीस यंत्रणेला ‘आव्हान’

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन ( अब्बास शेख.) – दौंड तालुक्यातील केडगाव परिसरामध्ये वर्षानुवर्षे खुलेआमपणे मटका सुरू ठेऊन मटका माफियांनी एक प्रकारे पोलीस यंत्रणेला आव्हान दिले आहे. केडगाव परिसरातील केडगाव स्टेशन, केडगाव बोरीपार्धी हद्द, शिवाजी चौक, बोरीपार्धी नाका या ठिकाणी राजरोसपणे मटका चालवला जात आहे. काहीही झाले तरी आमच्यावर कारवाई होणारच नाही, आमचा वशिला मोठा आहे या अविर्भावामध्ये हे मटका मालक वावरत आहेत. डब्बल चिठ्ठी, ऑनलाईन, पानावर भाव, मोबाईल एम.एम.एस अशा वेगवेगळ्या पद्धतीने या परिसरामध्ये मटका सुरू आहे.

मटक्‍याच्या विळख्यात सापडलेल्या लोकांच्या तोंडातून केडगावच्या शिवाजी चौकातील मटका अड्ड्याचे अनेक गुपिते आवर्जून ऐकण्यास मिळत आहेत. मटका अड्डा चालविण्याचे काम थेट मालक तर काही ठिकाणी एजंटाचा वापर करून केला जात आहे. या परिसरात एजंटांकडून फिरत्या स्वरूपातही मटका घेतला जात आहे. मटका कशा पद्धतीने आणि कोठे घ्यायचा, त्याचे कलेक्‍शन कोठे जमा करायचे ते मालकापर्यंत कसे पोहचवायचे, तेथून गिऱ्हाईकाचे पेमेंट कसे भागवायचे, याची स्वतंत्र यंत्रणाच येथे कार्यरत आहे.

मात्र या यंत्रणेकडे सहसा कोणी लक्ष का देत नाही हेही कोडे न उलगडण्या इतके अवघड राहिले नाहीये. येथे किरकोळ कारवाई केल्यानंतर सोईस्कररीत्या दुर्लक्ष करण्याची परंपरा बनली होती तीही ठप्प आहे. मटका कोठे, कसा सुरू आहे, त्याचे बुकी, मालक कोण याची माहिती सर्वांनाच असते मात्र जाणीवपूर्वक त्याकडे कानाडोळा केला जात असतो. या मटक्‍यात गुरफटलेली अनेक कुटुंबे उद्‌ध्वस्त झाली आहेत हे जळजळीत सत्य या परिसराला नवीन नाही.

हे थांबवणार कसे हाच खरा प्रश्‍न आहे. मटका मालक, चालकांवर कठोर पद्धतीची कारवाई केली जात नसल्याने या मटका चालकांचे मनोधैर्य उंचावत चालले आहे. हे मटका मालक नेमके कोण आहेत, कुणाच्या आशीर्वादाने हे सुरू आहे आणि त्यांचे जाळे नेमके कोठून कुठपर्यंत पसरले आहे याची माहिती पाहू पुढील भागात..

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/