बंगालप्रमाणे निवडणूक आयोगाचे वाराणसीमध्ये लक्ष का नाही ? : मायावती 

वाराणसी : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. प्रचार करताना राजकीय पक्षांमध्ये टीका-टिपण्णी तसेच आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणसी लोकसभा मतदारसंघातून जिंकवून आणण्यासाठी बाहेरच्या गुंडांकडून स्थानिक नागरिकांना धमकावण्याचे प्रकार सुरु असल्याचा आरोप ट्विटरद्वारे केला आहे.

मायावती यांनी ट्विटरद्वारे म्हंटल आहे की , ‘वाराणसीमध्ये कोणत्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी यांना जिंकविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. वाराणसीतील गल्लीबोळात जाऊन घरांमध्ये जाऊन पहिल्यांदा आमिष दाखवूननंतर धमकी दिली जात आहे. त्यामुळे तेथील निवडणूक स्वतंत्र्य आणि निष्पक्ष कशा होणार? बंगालप्रमाणे निवडणूक आयोगाचे वाराणसीमध्ये लक्ष का नाही?’

वाराणसी लोकसभा मतदारसंघात शेवटच्या टप्प्यामध्ये १९ मे रोजी मतदान होणार आहे. वाराणसी येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काँग्रेसने अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. तर सपा-बसपा आघाडीने काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे माजी उपसभापती श्यामलाल यादव यांची सून शालिनी यादव यांना समाजवादी पक्षाकडून उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर महाआघाडीने बीएसएफमधील बरखास्त जवान तेज बहादूर यांना आपला उमेदवार बनवले होते. मात्र तेज बहादूर यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने फेटाळल्याने शालिनी यादव पुन्हा एकदा महाआघाडीच्या उमेदवार बनल्या आहेत.