दूध दराचा प्रश्न चिघळणार ? महायुतीतर्फे 1 ऑगस्टला आंदोलनाचा ‘इशारा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपूर्वी राज्यात दुध दर वाढीसाठी विविध संघटनांनी आंदोलन केले. काही ठिकाणी संतप्त कार्यकर्त्यांनी दुधाच्या टँकरमधून दूध रस्त्यावर ओतून दिले. या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज्य सरकारने दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य न केल्यास भाजप, रयत क्रांती, आरपीआय, रासप आणि शिवसंग्राम महायुतीतर्फे 1 ऑगस्ट रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे.

आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली. महायुतीच्या या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महादेव जानकर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे, अविनाश महातेकर, भाजप किसान मोर्चा अध्यक्ष डॉ. अनिल बोंडे आदी उपस्थित होते.

दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी महायुतीकडून 21 जुलै रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. दूध उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांनाही पाठवण्यात आले. सरकारने या मागण्या मान्य केल्या नाही तर येत्या 1 ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महायुतीतर्फे सरकारला देण्यात आला होता. सरकारने दूध उत्पादकांच्या मागण्यांची दखल घेतली नसल्याने महायुतीच्या घटक पक्षांनी तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे आंदोलन अहिंसक पद्धतीने असेल, असेही महायुतीतर्फे स्पष्ट करण्यात आले.