‘मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे काम पाहून फडणवीसांचे डोळे पांढरे होतील’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मुंबईमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली देशातील सर्वात मोठी कोरोना संसर्ग विरुद्ध व्यवस्था कमी काळात उभारली गेली आहे. राज्यातील विविध भागात दौरे करणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकदा हे काम आपल्या नजरेखालून घालावे. हे भव्य काम पाहून त्यांचे डोळे पांढरे होतील, असा टोला शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी निसर्ग चक्रीवादळ आल्यानंतर सरकारने केलेली मदत तोकडी आहे असं म्हटलं होत. त्यावर फडणवीस यांनी अध्यात्मिक पुस्तक वाचावीत म्हणजे मनःशांती लाभेल, अशी टीका यापूर्वी देखील मुश्रीफ यांनी केली होती. त्यानंतर आता पुन्हा ठाकरे सरकार ज्या प्रमाणे काम करत आहे ते पाहून माजी मुख्यमंत्र्यांचे डोळे पांढरे होतील, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला आहे.

मुश्रीफ पुढं म्हणाले, मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्याशी कोरोना संसर्गा संदर्भात चर्चा केली असता त्यांनाही ऑगस्ट पर्यंत लस संशोधन होईपर्यंत मुंबईतील स्थिती आटोक्यात आणण्याची ग्वाही दिली आहे. राज्यात ४० किलोमीटरचे रस्ते बांधणार असल्याची घोषणा त्यांनी केली. राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतीची मुदत संपल्यामुळे गावांमध्ये प्रशासक नेमण्यात येणार असून, योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याचा अधिकार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावरती सोपवण्यात आला असल्याचं त्यांनी म्हटलं.