राज ठाकरे राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले असले तरी, ते आता येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक असणार, असल्याची चर्चा आहे. मात्र, त्यांचा सहभाग कशा प्रकारे असेल, ते राष्ट्रवादीच्या मंचावरून भाषण करणार की मनसेच्या मंचावरून याबाबत संदिग्धता आहे. जेथे राष्ट्रवादीला कडवे आव्हान आहे, त्या मतदार संघात राज ठाकरे यांच्या सभांचे आयोजन करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

दोन दिवसांपूर्वी मुंबईत शरद पवार यांची राज ठाकरे यांनी भेट घेतली. शरद पवार यांच्या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांमध्ये काही महत्वाच्या विषयावर चर्चा ही झाली होती. आगामी लोकसभा निवडणूक मी लढणार नाही असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर रंगशारदा येथे मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी जोरदार टीका ही केली होती. मोदी आणि शहा या दोन व्यक्ती जर राजकारणातून बाहेर पाडल्या तर खरी पक्षा-पक्षातील लढाई होईल. तसेच यावेळी तूम्ही भाजपविरोधात मतदान करा, त्याचा फायदा कोणाला होतो याचा विचार करू नका, असे म्हणत राज ठाकरे यांनी भाषणांमधून मोदी- शाह यांच्यावर टीका केली होती.

महाआघाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते मनसेला स्थान देण्यास तयार होते. परंतु, काँग्रेसने मनसेला विरोध दर्शवला होता. त्यामुळे आता राष्ट्रवादीने मनसेशी छुपी आघाडी करण्याची भूमिका घेतल्याचे समजते. एका वृत्तपत्राला राष्ट्रवादीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या मतदारसंघात राष्ट्रवादीसमोर भाजपा – शिवसेनेचे कडवे आव्हान असेल, त्या मतदारसंघात राज ठाकरे हे सभा घेतील. आता राष्ट्रवादीची ही रणनिती यशस्वी होते का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.