… म्हणून ‘मनसे’च्या ‘त्या’ पदाधिकार्‍यानं केली आत्महत्या, चिठ्ठीत लिहीलं ‘हे’ कारण

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे मी माझे जीवन माझ्या मनाने संपवत आहे. तरी माझ्यामुळे कोणालाच त्रास देऊ नका. माफ करा‘राजसाहेब ’ म्हणत मनसे पदाधिकार्‍याने आत्महत्या केली आहे. किनवट येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरप्रमुख सुनिल आनंदराव ईरावार (वय 27 ) यांनी स्वत:च्या गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

आत्महत्येपूर्वी ईरावार यांनी लिहिलेल्या पत्रात त्यांनी आईची व कुटुंबियांची माफी मागितली आहे. तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांना उद्देशून लिहिले की, राजसाहेब, मला माफ करा. आमच्या येथे पैसा आणि जात या गोष्टीवर राजकारण आहे आणि दोन्ही माझ्याजवळ नाही, असे म्हटले आहे. यावरून किनवट पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पुढील तपास बीट जमादार गजानन चौधरी हे करीत आहेत. शवविच्छेदनानंतर कुटुंबियांना पार्थिव सोपविण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, काका, काकू, तीन भाऊ व दोन वहिनी असा परिवार आहे. ग्राम विकास , स्वच्छता, वैद्यकीय सुविधा अशा विविध सामाजिक बाबींसाठी सदैव पुढाकार घेणारे सुनिल ईरावार हे ओबीसी शोषित संघटना, किनवटचे तालुकाध्यक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सनेचे किनवट शहराध्यक्ष होते.