भाजपसोबत मनसे युती करणार का ?, बाळा नांदगावकरांनी दिलं ‘हे’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   दोन वर्षांनी होणा-या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने रणशिंग फुंकले आहे. शिवसेनेचा सर्वात मोठा गड असलेल्या मुंबई महापालिकेवर 2022 मध्ये भाजपचाच भगवा फडकेल, अशी गर्जना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. त्यानंतर 100 पिढ्या आल्या तरी महापालिकेवरील भगव्याला हात लावायची कोणाची हिंमत होणार नाही, अशा शब्दात खा. राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी जोरदार आव्हान भाजपला दिले आहे. त्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापत आहे. त्यातच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर ( Leader of Opposition in the Legislative Council Praveen Darekar) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच्या युतीबद्दल केलेल्या प्रश्नाला दिलेल्या उत्तराने तर अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत.

मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेसोबत युती होणार का, असा प्रश्न दरेकर यांना विचारला असता, त्यावर ते म्हणाले की, सध्यातरी भाजप स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे. पण निवडणुकीच्या वेळी निर्णय घेऊ असे सांगत त्यांनी आगामी काळात मनसे-भाजप युती होईल का? याची उत्सुकता कायम ठेवली आहे. प्रविण दरेकर यांच्या प्रतिक्रियेनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर (mns-leader-bala-nandgaonkar) यांना भाजपसोबत युती करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे याबद्दल विचार करतील. राज साहेबांनी विचार करायला प्रविण दरेकर आता फारच मोठा झाला आहे, असा टोला नांदगावकर यांनी लगावला आहे.

काय म्हणाले होते खा. राऊत

देवेंद्र फडणवीस राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांसमोर अशी विधाने करु शकतात, भाजपाला वाटत असेल आता जो छत्रपतींचा भगवा फडकत आहे तो शुद्ध नाही आणि ते जे कोणता भगवा फडकवणार असेल तो शुद्ध आहे, याचा निर्णय जनता ठरवेल. मुंबई महाराष्ट्राला मिळवण्यासाठी राज्यात 105 हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे. ज्या ज्या वेळी दिल्लीकडून मुंबईची कुंचबणा झाली त्यावेळी तेंव्हा मराठी माणूस रस्त्यावर उतरला आहे, त्यात शिवसैनिक आघाडीवर आहे. हा इतिहास भाजपाने चाळला पाहिजे. या लोकांना मुंबई महाराष्ट्रात ठेवायची नाही. मुंबईत येणाऱ्या उद्योगपतींना हुसकावून त्यांच्या राज्यात नेतात, मुंबईचं महत्त्व कमी करतायेत त्यावर भाजपा नेते बोलत नाही.100 पिढ्या आल्या तरी मुंबई महापालिकेवर भगवा उतरवायचे सोडा पण हात लावण्याचीही हिंमत नाही, कारण या भगव्यात आग आहे असे राऊत म्हणाले होते.