सोलापुरात शेळीचोर समजून तरुणाला झाडाला बांधून मरेपर्यंत मारहाण

सोलापुर (Solapur) : पोलिसनामा ऑनलाईन  – गावकर्‍यांनी तरुणाला चोर समजून केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोलापूर (Solapur ) जिल्ह्यातील वळसंग पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुंभारी येथे घडली आहे. शेळ्या चोरणारी टोळी आली आहे, अशी अफवा उठली असताना अंधारात तरुण गावातल्या काही लोकांना आढळला होता. गावातील या लोकांनी शेळीचोर समजून तरुणाला झाडाला उलटा टांगून बेदम मारल्याने त्याचा मृत्यू झाला.

गावातील इतर लोकांनी वळसंग पोलीस ठाण्यात प्रकरणाची माहिती दिल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी झाडावरील मृतदेह उतरवून हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्या तरुणाला मृत घोषित केले. प्रकरणात पोलिसांनी चौघांना अटक केली केली आहे. संबंधित गावात गेल्या काही दिवसांपासून शेळी चोराची अफवा पसरली होती. त्यामुळे गावकर्‍यांमध्ये राग होता. त्यात हा तरुण गावकर्‍यांना सापडल्यामुळे त्याचा बळी गेला. या घटनेबद्दल प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस घटनेचा तपास करत असून तो तरुण कोण होता याचाही माहिती घेतली जात आहे.