पंतप्रधानपदाची पातळी खालावली : काॅंग्रेस नेते कपिल सिब्बल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मोदींच्या विधानांनी पंतप्रधानपदाची पातळी खालावली आहे, असा आरोप काँग्रेसचे जेष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केला आहे. तसेच सर्जिकल स्ट्राइक’मधून बाहेर पडून त्यांनी आता बेरोजगारी आणि गरिबीकडेही लक्ष द्यायला हवे, असा सल्लाही त्यांनी दिला.

मोदींवर टीका करताना सिब्बल म्हणाले की, मोदींच्या विधानांनी पंतप्रधानपदाची पातळी खालावली आहे. मोदी सध्या भारताबाबत नाही, तर फक्त पाकिस्तानबद्दल आणि तेथील लोकांबाबत बोलत आहेत. मोदींपूर्वी कोणत्याही पंतप्रधानाने अशी भूमिका घेतली नव्हती. सर्जिकल स्ट्राइक’मधून बाहेर पडून त्यांनी आता बेरोजगारी आणि गरिबीकडेही लक्ष द्यायला हवे, मोदी सरकार बुलेट ट्रेनवर खर्च करण्यास तयार आहे ; पण गरिबांसाठी पैसे खर्च करायला तयार नाही.’

मोदींनी दिलेल्या भ्रष्टाचार रोखण्याच्या आश्वासनाविषयी सिब्बल म्हणाले की, ‘देश लुबाडून नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांनी देशाबाहेर पळ काढला. असा चौकीदार आपल्याला खरंच हवा आहे का?’

मोदी यांना पूर्वीच्या चहावाल्याचा विसर पडून आता राजकीय लाभासाठी चौकीदाराबद्दल प्रेमाचे भरते आले आहे, अशी टीका यापूर्वी कपिल सिब्बल यांनी केली होती.