जन्मदात्या आईनं मुलीला 5 लाखात ‘विकलं’, ‘दुप्पट’ वय असणाऱ्या व्यक्तीसोबत लावून दिलं ‘लग्न’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   हरियाणामध्ये एक लाजीरवाणी घटना समोर आली आहे. येथे एका आईने आपल्या 17 वर्षीय मुलीला एका 40 वर्षाच्या व्यक्तीला काही पैशासाठी विकले आहे. अशा घटना सऱ्हास समोर येत असतात. काही दिवसांपूर्वी तर एका व्यक्तीने आपल्या गर्भवती पत्नीचे पोट फाडले होते, जेणेकरून समजू शकेल की मुलगा आहे की मुलगी. आपल्या देशात अजूनही स्त्री-पुरुष समानतेला महत्त्व देणाऱ्या घटना घडत असतात. अल्पवयीन मुलांचा विवाह करणे कायद्यानुसार गुन्हा असून देखील काही पैशासाठी आईने आपल्या 17 वर्षाच्या मुलीचे लग्न 40 वर्षांच्या माणसाशी लावून दिले. चाइल्ड लाईनला याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने मुलीची सुटका केली.

बाल कल्याण समितीच्या संचालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा रोहतकमध्ये दाखल करण्यात आला. पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, गावातील एका व्यक्तीने आईला काही पैसे देऊन मुलीला विकत घेतले होते. आणि त्या मुलीचे लग्न गावातील 40 वर्षीय विक्रम नामक व्यक्तीशी लावून दिले होते. पीडित मुलीने चाइल्ड लाइनला घटनेची कशीबशी माहिती दिली. त्यानंतर बाल कल्याण समिती रोहतककडे हे प्रकरण पोहोचले. तत्काळ बाल कल्याण पथक गावात पोहोचले. त्यांनी चौकशी केली असता हे लक्षात आले की मुलीला विकत घेण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त एका 12 वर्षाच्या मुलीलाही आणण्यात आल्याचे समजले. पथकाने त्या मुलीची सुटका करून तिला बालिकाश्रमात पाठवले आहे.

दरम्यान या दोन्ही मुलींनी सांगितले की विक्रम यमुनानगरला आपल्या कुटुंबातील दोन सदस्यांसह आला होता. येथे मुलीच्या कुटुंबीयांनी झासू नामक व्यक्तीकडून 5 लाख 60 हजार रुपये घेतले होते. त्यानंतर मुलीला तिच्या मैत्रिणीच्या 12 वर्षाच्या बहिणीसह रोहतक येथे पाठविण्यात आले. विक्रमने येथील एका मंदिरात मुलीशी लग्न केले. मुलीचा या लग्नाला विरोध होता, पण लोकांनी तिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव आणला. सध्या या दोन्ही मुलींची सुटका करण्यात आली असून त्यांना बालिकाश्रमात पाठवण्यात आले आहे. विक्रम, झासू आणि मुलीच्या आईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी करीत करीत आहेत.