कौतुकास्पद ! …अन् स्वच्छता कामगाराचा मुलगा झाला न्यायाधीश

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – अ‍ॅड. कुणाल वाघमारे यांचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दहावा क्रमांक आला आहे. दिवाणी न्यायाधीश स्तर (क) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी या पदासाठी त्यांची निवड झाली आहे. कुणाल यांनी 200 पैकी 158 गुण मिळवले आहेत. शनिवारी रात्री या परिक्षेचा निकाल घोषित झाला होता. राज्यात ते दहावे आले असले तरी अनुसूचित जाती प्रवर्गात कुणाल यांचा पहिला क्रमांक आला आहे. कुणाल हे सोलापूरचे रहिवासी आहेत. त्यांच्या यशानंतर सोलापूरासह राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना कुणाल वाघमारे म्हणाले, “खूप छान वाटतंय, माझं स्वप्न पर्ण झालं आहे. आई-वडिलांचे कष्ट आणि त्यांच्या विश्वासामुळे आज इथे पोहोचण्याचं बळ मिळालं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर कायम होता. त्यांचा आदर्श ठेवून मी परीक्षेची तयारी केली आणि मला ध्येय गाठता आले.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

कुणाल यांनी सोलापूरातच शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी SSW ची पदवी घेतली. यानंतर 2014 साली ते LLBची परीक्षा देऊन सोलापूर विद्यापीठातून प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झाले. 2016 साली त्यांनी एलएलएम पूर्ण करून त्यांनी राज्यसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी सुरू केली. आज त्यांच्या मेहनतीचं चीज झालं. कुणाल सोलापूरातील आंबेडकर नगर येथील रहिवासी आहेत. त्यांचे आई-वडिल महानगरपालिकेत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करतात. आपल्या मुलानं न्यायाधीश व्हावं अशी त्यांची इच्छा होती.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/