‘अशा’ प्रवृत्तीचा बंदोबस्त जागीच केला पाहिजे, शिवप्रेमींच्या संतापाला खासदार संभाजीराजेंचा फुल्ल सपोर्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्याला शिवप्रेमींनी चोप दिला. सोशल मीडियात शिवप्रेमींच्या या कृत्याचं समर्थन करणाऱ्या अनेक पोस्ट येत आहेत. अशातच छत्रपती घराण्याचे वंशज आणि खासदार संभाजीराजे भोसले यांनी देखील शिवप्रेमींच्या संतापाला पाठींबा जाहीर केला आहे.

याबाबत खासदार संभाजीराजे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहली आहे. आपल्या पोस्टमध्ये खासदार संभाजीराजेंनी म्हटले आहे, विमानातून बाहेर आलो आणि मोबाइल मध्ये शिवभक्तांनी छत्रपती घराण्याची बदनामी करणाऱ्या इसमाला चोप दिलेला व्हिडिओ पाहीला. माझ्या सुद्धा मनातली इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान वाटले. अशा प्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त जागीच केला तर दुसरा कोणी धाडस करणार नाही, अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

तसेच आपण कायदा मानणारे, कायद्याचे पालन करणारे शिवरायांचे वंशज आहोत. पण ह्या प्रकरणात माझा सुद्धा संयम सुटला होता. मी त्या सर्व शिवभक्तांच्या पाठीमागे ठाम उभा आहे ज्यांनी ही कामगिरी केली. माझ्यासारख्या कोट्यावधी शिवभक्त तुमच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. ही मोहीम फत्ते करणाऱ्या सर्व शिवभक्तांचे मनापासून अभिनंदन करतो असेही त्यांनी सांगितले आहे.