मुंबईत मुसळधार पावसामुळं कमरे इतकं साचलं पाणी, ठाण्यात कोसळली इमारत, IMD नं दिला सतर्कतेचा ‘इशारा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   महाराष्ट्राची राजधानी मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून अधून-मधून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे चेंबूर आणि अंधेरीतील बर्‍याच भागात मुबलक प्रमाणात पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार 5 ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पावसाच्या दरम्यान महाराष्ट्र व गोवा किनारपट्टीवर ताशी 50 ते 60 किमी प्रति तासाच्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

आयएमडीने मुसळधार पावसाचा इशारा दिला आणि सांगितले की या पावसामुळे शहरातील जुन्या इमारती धोक्यात येऊ शकतात. हवामान खात्याने लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. पुढील एक-दोन दिवस पावसामुळे वाहतुकीवरही परिणाम होऊ शकतो, असा सल्लाही देण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) मच्छिमारांना किनाऱ्यापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. रविवारी मुंबईच्या कुलाबा किनाऱ्यावर हाय टाईड (High Tide) ची धडक झाली. कुलाबातील समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या मच्छिमारांना सतत पडणाऱ्या पावसामुळे घरात पाणी साचण्याची भीती आहे. त्यांनी स्थानिक प्रशासनाची मदत घेतली आहे. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) मुंबई व आसपासच्या भागात येत्या 24 तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीवरील मच्छिमारांना त्यांनी समुद्रात जाऊ नये असे सांगितले आहे.

ठाण्यात एक इमारत कोसळली, कोणतीही जीवितहानी झाली नाही

मुंबईत सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ठाण्यात एक रिकामी इमारत कोसळली. आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख संतोष कदम म्हणाले की, एका महिन्यापूर्वी ही इमारत रिकामी करण्यात आल्यामुळे दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सायन पोलिस स्टेशनचा गेट व आजूबाजूचा परिसर पाण्याने भरला आहे आणि पावसामुळे आता पाणी आतील बाजूस जाऊ लागले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पोलिस ठाण्यात पाण्याचा भराव वाढण्याचा धोका वाढला आहे.

आयएमडीचे म्हणणे आहे की, गेल्या 24 तासांत मुंबई व आसपासच्या भागात अतिवृष्टी झाली. आज सकाळी 8.30 वाजेपर्यंत ठाण्यात 28 सेमी, सांताक्रूझ 20.1 सेमी, कुलाब्यात 13 सेंमी पाऊस झाला. दरम्यान अजून पाऊस तीव्र होण्याची शक्यता आहे. आयएमडीने यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केले आहेत. यलो अलर्ट म्हणजे ‘अपडेट होणे’, ऑरेंज अलर्ट म्हणजे ‘अधिकाऱ्यांनी तयार असणे’ आणि रेड अलर्ट म्हणजे ‘कारवाई करणे’ हे संकेत ते दर्शवतात.

शनिवारी सकाळी 8.30 वाजेपासून 12 तासात दक्षिण मुंबईच्या कुलाबामध्ये हवामान केंद्रात 74.6 मिमी पावसाची नोंद झाली तर पश्चिम उपनगरातील सांताक्रूझ हवामान केंद्रात 132.2 मिमी पावसाची नोंद झाली.