मुंबई : फोर्टमध्ये इमारतीचा भाग कोसळला, बचावकार्य सुरु

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिस या ठिकाणी एका इमारतीचा भाग कोसळला आहे. जीपीओ अर्थात जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर असलेल्या शहीद भगत सिंग मार्गावरच्या इमारतीचा भाग कोसळला आहे. भानुशाली इमारत असं या इमारतीचं नाव आहे. या ठिकाणी शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी धाव घेतली. इमारतीचा भाग कोसळला त्या इमारतीची दुरुस्ती सुरु होती. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान या ठिकाणी मदत कार्य आणि बचावकर्य सुरु आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब आणि एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. त्यांच्याकडून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

आज सायंकाळी 4.43 मिनिटांनी फोर्ट येथील जीपीओ समोरील कबुतरखान्याजवळ असलेली भानुशाली इमारतीचा काही भाग कोसळला. ही तळमजला अधिक पाच मजली रहिवाशी इमारत आहे. इमारतीचा भाग कोसळताच जोरदार आवाज झाला. त्यामुळे परिसरातील लोक घाबरले आणि आवाजाच्या दिशेने पळत सुटले. इमारतीचा काही भाग कोसळल्याचे पाहून स्थानिकांनी तत्काळ अग्निशमन दल आणि पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली.

पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनही तात्काळ घटनास्थळी येऊन ढिगार उपसण्यास सुरुवात केली आहे. सध्या या ठिकाणी अग्निशमन दलाचे 8 फायर इंजिन, 2 रेस्क्यू व्हॅन आणि 10 डंपर्स कार्यरत आहेत. महापालिकेच्या 50 मजूरांच्या सहाय्याने हा ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, मुंबईत पावसाची रिपरिप सुरु असल्याने कामात अडथळा निर्माण होत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like