राज्य गारठलं ! पुणे, नाशिकचे तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – राज्यात गुलाबी थंडीचे आगमन झाले आहे . दोन दिवसांपासून हवेत गारवा वाढला असून तापमानही घसरू लागले आहे. मुंबई , पुणे, नाशिक गारठले असून सर्वाधिक कमी तापमान परभणी येथे ९.९ अंश सेल्सिअस इतके नोंदवले आहे. दरम्यान , पुढील दोन दिवस म्हणजे दिवाळीत तापमान वाढण्याची शक्यता आहे . त्यामुळे थंडीची तिव्रताही कमी होईल, असे हवामान खात्याने सांगितले आहे.

दरम्यान, पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी म्हणाले की, सध्या उत्तर पूर्वेकडून हवा दक्षिणेच्या दिशेने वाहत आहे. उत्तरेकडील थंड वारे राज्यात येत आहेत. त्यामुळे निर्माण झालेली ही परिस्थिती थंड हवेच्या लाटेच्या जवळपास जाणारी आहे.

गुलाबी थंडीने संपूर्ण राज्य व्यापले आहे.विदर्भ, मराठवाडा, आणि पश्चिम महाराष्ट्र आदी ठिकाणी तापमानात मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून दोन दिवसांपासून पुणे आणि नाशिकचे तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा खाली नोंदवले गेले आहे. मुंबईचे किमान तापमान १९.४ अंश सेल्सिअस आहे. पहाटेच्या गारव्यामुळे मुंबईकरांना गुलाबी थंडीचा अनुभव घेता येत आहे.

थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या महाबळेश्वर येथे यंदा पुन्हा बर्फाची चादर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सांगली, नांदेड, उस्मानाबाद, मालेगाव, सातारा, बारामती, औरंगाबाद, नांदेड, कोल्हापूर, जळगाव, सोलापूर, जालना येथील किमान तापमान १५ अंशाखाली घसरले.