शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्यासाठी महापालिकेची तयारी सुरू : अति. महापालिका आयुक्त सुरेश जगताप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुणे महापालिकेने येत्या 23 नोव्हेंबरपासून इयत्ता 9 ते 12 वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबत तयारी सुरू केली आहे. तसेच शहरातील नाट्यगृहांमध्ये साफसफाईची कामे सुरू केल्याने नाट्यगृहातील पडदाही लवकरच उघडला जाईल, अशी चिन्हे दिसत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात लॉकडाउन सुरू झाल्यानंतर शाळा महाविद्यालयांसह सर्व सार्वजनिक सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. अत्यावश्यक गरजा तसेच कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण पाहून टप्प्याटप्प्याने सर्व सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाने नुकतेच 23 नोव्हेंबरनंतर 9 ते 12 वीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश देताना विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांच्या संमतीसोबतच विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर, हात धुण्यासाठीची सुविधा करणे आदी गाइडलाइन्स दिल्या आहेत.

यासंदर्भात माहिती देताना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप यांनी सांगितले की, महापालिकेच्या 9 ते 12 वीपर्यंतच्या 43 शाळा आहेत. या ठिकाणी 8 हजार 631 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी शाळांच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रत्येक शाळेत हात धुण्याची सोय करण्यासाठी दुरुस्तीविषयक कामे सुरू केली आहेत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अँटीजन किटद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. तशा याद्या तयार करण्यात आल्या आहेत. दुपारी 12 ते 4 या वेळेत वर्ग भरतील यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.

महापालिकेची नाट्यगृहेदेखील सुरू करण्यात येणार आहेत. बराच काळ नाट्यगृहे बंद असल्याने सफाईविषयक कामे सुरू आहेत. बालगंधर्व रंगमंदिर , कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि पद्मावती येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनच्या स्वछतेचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. ही नाट्यगृहे लवकरच सुरू करण्यात येतील, अशी माहिती जगताप यांनी दिली.