भाजपचे मुरलीधर मोहोळ पुण्याचे नवे महापौर, प्रकाश कदमांचा केला पराभव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे मुरलीधर किसनराव मोहोळ यांची पुणे महापालिकेचे महापौर म्हणून निवड झाली आहे तर उपमहापौर पदाची माळ भाजपच्याच सरस्वती शेंडगे यांच्या गळयात पडली आहे. मोहोळ यांनी महाविकासआघाडीच्या प्रकाश कदमांचा पराभव केला. निवडणुकीत शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मदत केली.

भाजपमधील इच्छुकांमध्ये महापौर पदावर विराजमान होण्यासाठी चढाओढ लागली होती. मात्र, शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ यांनी महपौर पदासाठी मुरलीधर मोहोळ यांचे तर उपमहापौर पदासाठी सरस्वती शेंडगे यांचे नाव जाहीर केले होते. पुण्याचे महापौरपद खुल्या गटासाठी आरक्षित होते. महापालिकेत भाजपचे 99 नगरसेवक आहेत. त्यामुळे महापौर हा भाजपाचाच होणार हे निश्चित होते. मोहोळ हे आता पुण्याचे महपौर म्हणून निवड झाली आहे. सन 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मोहोळ हे खडकवासला मतदार संघात भाजपाचे अधिकृत उमेदवार होते.

कोण आहेत मुरलीधर मोहोळ
मोहोळ यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1974 रोजी झाला असून त्यांचे शिक्षण बी.ए. पर्यंत झाले आहेत. आत्तापर्यंत त्यांनी भाजपमध्ये भाजपा वार्ड सरचिटणीस, भाजपा वार्ड अध्यक्ष, अध्यक्ष (भारतीय जनता युवा मोर्चा, पुणे शहर), चिटणीस (भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र), उपाध्यक्ष (भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र), सरचिटणीस (भाजपा, पुणे शहर) आणि संघटन सरचिटणीस (भाजपा, पुणे शहर) या भूमिका आणि जबाबदार्‍या पार पाडल्या आहेत. निवडणूकीत पीठासीन अधिकारी म्हणून कौस्तुभ दिवेगावकर यांनी काम पाहिले. भाजपचे मुरलीधर मोहोळ यांना 97 मते पडली तर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचे प्रकाश कदम यांना 59 मते पडली. शिवसेनेने राष्ट्रवादीला मदत केली. दरम्यान, मनसेने तटस्थ भूमिका घेतली.

लोकप्रतिनिधित्व
1. सभासद, पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळ
2. पुणे महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून सलग 3 वेळा विजयी
3. पुणे महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष – 2017-18
4. संचालक, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएससीडीसीएल) – 2017/18
5. संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) – 2017/18
6. सभासद, पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) – 2017/18